पुण्यातील चार तरुणांच्या ‘स्टार्टअप’चा प्रेरणादायी प्रवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातची चांगली नोकरी सोडून त्यांनी व्यवसायात पाऊल टाकायचे ठरवले.. प्रत्येकी ११ हजार प्रमाणे ४४ हजारांच्या गुंतवणुकीतून सुरुवातही झाली.. मात्र, समोर अनेक आव्हानेही होती.. आता मागे हटायचे नाही या निग्रहाने त्यांनी धडपड सुरूच ठेवली.. अखेर त्यांच्या धडपडीला यश मिळत गेले आणि आज त्यांची उलाढाल ४.५ कोटींवर पोहोचली आहे.

हा प्रेरणादायी प्रवास आहे रोहित लोहाडे, खुशबू भट्टड, परिणित ताथेड आणि रितेश जैन या सनदी लेखापाल असलेल्या तरुणांचा.. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या ‘बिझनेस सेटअप’ या त्यांच्या स्टार्टअपने आता मोठी मजल मारली आहे. रोहित आणि परिणित नगरचे, रितेश नंदूरबारचा आणि खुशबू पुण्याची आहे. स्वतचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी एका नामांकित कंपनीतील नोकरी सोडली. त्यांची ‘बिझनेस सेटअप’ ही कंपनी व्यवसाय सुरू करण्यासाठीचे सर्वागीण मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पूर्तता करून देते. पाच वर्षांपूर्वी स्वत नोकरी करणाऱ्या या चौघांच्या हाताखाली आता ४० तरुण काम करत आहेत. त्यांची पुण्यासह मुंबई आणि बंगळुरू येथेही कार्यालये आहेत.

‘आम्ही नोकरी सोडून प्रत्येकी ११ हजार रुपये काढून काही पुस्तके आणि साहित्यासह सनदी लेखापाल म्हणूनच व्यवसाय सुरू केला होता. पहिले सहा महिने काहीच काम मिळाले नव्हते. अखेर एका मित्राची कंपनी सुरू करण्यासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेचे काम केल्यावर हाच व्यवसाय होऊ शकतो हे लक्षात आले आणि आम्ही ‘बिझनेस सेटअप’ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र, कुटुंबीयांनी आम्हाला पाठिंबा दिला, स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ दिला, म्हणून आम्ही शिकत राहिलो, काम करत राहिलो. आता आमच्या कंपनीची उलाढाल ४.५ कोटींवर पोहोचली आहे,’ असे रोहितने सांगितले.

‘बिझनेस सेटअप’ची २०१४ मध्ये स्थापना झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी जवळपास १ हजार ५०० हून अधिक कंपन्या सुरू करून दिल्या आहेत. गेल्या काही काळात तर साधारणपणे दिवसाला एका कंपनीची स्थापना या वेगाने ते काम करत आहेत. ऑल इंडिया रेडिओ, डीआरडीओ, गॅरिसन इंडिया अशा सरकारी आस्थापनांसाठीही ते करविषयक कामे करतात.

‘स्टार्टअप इंडिया’च्या धोरणात बदल

केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ या योजनेच्या कठोर निकषांमुळे जेमतेम ५ ते १० टक्केच स्टार्टअप योजनेत पात्र ठरली. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने जवळपास ९० टक्के स्टार्टअप योजनेत अपात्र ठरतात. त्यामुळे स्टार्टअप इंडियाच्या धोरणात बदल करण्याचे आम्ही केंद्राला सुचवले होते. त्यानुसार अलीकडेच या धोरणात काही बदल करण्यात आल्याची माहिती रोहितने दिली.

अन्य गुंतवणूक

कंपन्या स्थापन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याबरोबरच आम्ही भविष्यकालीन योजनाही ठरवली आहे. त्यानुसार चांगली कल्पना असलेल्या स्टार्टअपना आर्थिक निधी मिळवून देत आहोत. तसेच एखादी कल्पना आम्हाला आवडली, तर आम्हीही त्यात गुंतवणूक करणार आहोत, असे रोहित म्हणाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Startup india scheme success story
First published on: 26-05-2019 at 01:21 IST