अन्न, पाणी आणि ऊर्जा विषयांवर संशोधन

प्रथमेश गोडबोले, पुणे</strong>

अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने ‘शाश्वत नागरी पर्यावरणासाठी अन्न, पाणी आणि ऊर्जा’ (फूड-वॉटर-एनर्जी फॉर अर्बन सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट) या विषयावरील संशोधनाला सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत भविष्यात नागरीकरणाला अत्यावश्यक असलेल्या अन्न, पाणी आणि ऊर्जा या विषयीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाने भारतातून पुणे शहराची निवड केली आहे.

सन २०५० पर्यंतचे पुण्याचे नागरीकरण, पाण्याची गरज यांबाबत संशोधन होणार आहे. शाश्वत जलविकासाच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय प्रस्तावित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नावीन्यपूर्ण सुशासन व्यवस्था संशोधनाअंती सुचवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’ या संस्थेत कार्यशाळाही पार पडली. नाशिक येथील राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे आणि पुणे विभागातून पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे या कार्यशाळेत उपस्थित होते.

‘स्टॅनफर्ड विद्यापीठाने अभ्यासाअंती असा अंदाज वर्तवला आहे, की महाराष्ट्रात २०५० पर्यंत पावसाचे प्रमाण वाढणार आहे. मात्र, पावसाचा लहरीपणाही वाढणार आहे. दोन पावसांमधील अंतर जास्त असेल. पावसाची टक्केवारी वाढेल, मात्र लहरीपणाही वाढेल. त्या दृष्टीने या प्रकल्पावर गेल्या दीड वर्षांपासून काम सुरू आहे. पुण्यात होणाऱ्या अभ्यासाबाबतची माहिती प्रकल्पावर काम करणाऱ्यांकडे संकलित झाली आहे. आता पुढील दीड वर्ष माहितीचे विश्लेषण होणार असून विविध संगणकप्रणालींद्वारे काम होणार आहे’, अशी माहिती प्रवीण कोल्हे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पुण्याचीच निवड का?

स्टॅनफर्ड विद्यापीठाने सात वर्षांपूर्वी जॉर्डनमधील अम्मान शहराचा अभ्यास केला होता. अभ्यासाअंती अम्मान शहराचे २०५० साठीचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. हे प्रारूप अभ्यासण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी अम्मानप्रमाणेच जगातील दुसऱ्या शहराचा अभ्यास विद्यापीठाला करायचा आहे. वाढत जाणारे नागरीकरण, पाण्याबाबत शहरी-ग्रामीण वाद, पाण्याची कमी संसाधने, शहराच्या खालील अवर्षणप्रवण भाग अशा अटी अभ्यासासाठी होत्या. भारतातील विविध नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यातून पुण्याची निवड झाली.

संशोधनात काय

काय असेल संशोधनात अपर भीमा उपखोरे म्हणजे भीमा नदीचे उमगस्थान ते उजनी धरण आणि भीमा नदीला मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी अशा सर्व नद्या, कुकडी प्रकल्प यांचा अभ्यास होईल. या नद्यांवर आणि नद्यांशी निगडित प्रकल्प करताना पाण्याचे नियोजन कसे केले होते, तेव्हा या प्रकल्पांतर्गत पडणारा पाऊस, सध्या पडणारा पाऊस आणि २०५० मध्ये या क्षेत्रात किती पाऊस पडेल आणि या प्रकल्पांचा सध्याचा वापर यांचा अभ्यास होईल. पुण्यातील आणि ग्रामीण भागातील पाण्याचे वाटप, पाण्याची गुणवत्ता तसेच भारताचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाण्याबाबतचे निकष तपासले जातील. त्यानुसार अभ्यासाची उद्दिष्टे निश्चित करून विविध उपाययोजना संगणकप्रणालींद्वारे तयार होतील. त्यासाठी स्टॅनफर्ड विद्यापीठाचे विविध विषयांचे १२ पीएचडीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यात त्यांना नगर नियोजनकार, अर्थतज्ज्ञ, जलवैज्ञानिक, पर्यावरण विषयक तज्ज्ञ मदत करतील. २०५० पर्यंत पुण्याची लोकसंख्या लक्षात घेऊन किती पाणी लागेल, ते कसे मिळवावे, त्यासाठी करायच्या उपाययोजना असा अभ्यासाचा अंतिम परिणाम असेल.