News Flash

जलतरण तलावांची सुरक्षितता वाऱ्यावर

पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरभरात बारा जलतरण तलाव उभारण्यात आले आहेत.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने जलतरण तलावांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पिंपरीत १२ तलावांसाठी १९ जीवरक्षक; सुरक्षारक्षकांचीही कमतरता

पिंपरी महापालिकेच्या वतीने कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जलतरण तलावांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत, जीवरक्षकांची कमतरता आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून या ठिकाणी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरभरात बारा जलतरण तलाव उभारण्यात आले आहेत. सांगवी, िपपळे गुरव, चिंचवड, मोहननगर, नेहरूनगर, भोसरी, पिंपरी आदी ठिकाणी बांधलेल्या या तलावांसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मोशी, चऱ्होली, इंद्रायणीनगर आदी ठिकाणी आणखी काही तलाव उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तलावांची उभारणी, देखभाल व दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. तथापि, तलावांच्या माध्यमातून अगदी तुटपुंजे उत्पन्न पालिकेला मिळते. मावळत्या आर्थिक वर्षांत पालिकेला वर्षभरात जेमतेम ६१ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. निष्काळजीपणामुळे अलीकडच्या काही दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वाकड येथे २४ वर्षीय संगणक अभियंता बुडून मरण पावला. तर, भोसरी येथील सहल केंद्रात एक तरुण बुडाल्याची घटना ताजी आहे. यापूर्वी, अशाप्रकारच्या अनेक घटना विविध जलतरण तलावांमध्ये झाल्या आहेत. तरीही परिस्थितीत काही सुधारणा होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. आपल्या भागात जलतरण तलाव सुरू व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींचा बराच आटापिटा दिसून येतो. प्रभागातील नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगतानाच ते स्वत:ची आर्थिक गणितेही सांभाळत असल्याचे दिसून येते. तथापि, या खर्चिक तलावांची निगा राखण्यात महापालिकांना अपयश आले आहे. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नाही. तलावांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. सुरक्षा कर्मचारी पुरेसे नाहीत. त्याचपद्धतीने जीवरक्षकांची संख्या अतिशय तोकडी आहे. तलावांवर अनेक गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामागे कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारांचे अर्थकारण असल्याची शंका व्यक्त केली जाते.

जीवरक्षकांच्या मागणीकडे चार वर्षांपासून दुर्लक्ष

शहरातील १२ जलतरण तलावांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत जीवरक्षकांची संख्या अतिशय तुटपुंजी आहे. सर्व मिळून अवघे १९ जीवरक्षक नियुक्त आहेत. वास्तविक पाहता, ५६ जीवरक्षकांची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवरून चार वर्षांपासून हे जीवरक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी होत असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मदतनीस म्हणून १० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी दहा मदतनीस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तथापि, प्रशिक्षित जीवरक्षकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:35 am

Web Title: swimming pools safety issue pmc
Next Stories
1 माहितीपर पुस्तकांवर ४० टक्के वाचकांच्या पसंतीची मोहोर
2 नांदेड सिटीमधील घरांसाठी ३० जूनला सोडत
3 रात्रशाळांबाबतच्या निर्णयाचा राज्य सरकारला विसर
Just Now!
X