विविध माध्यमातून नव्या पिढीला गोंधळात टाकत व्यवस्था मोडायची आणि दंडेलशाहीने आपल्याला हवी असणारी व्यवस्था आणायची असे सध्या काम सुरू आहे. अशा वृत्तीमुळे समाजात मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली असून सरकारला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केली.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला तीन वष्रे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित निषेध सभेत आंबेडकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ, सुभाष वारे, प्रा. अजित अभ्यंकर, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, मुक्ता दाभोलकर, मनीषा गुप्ते, प्रा. रझिया पटेल, समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील या वेळी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले,‘‘डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यात तपास यंत्रणांना राजकीय दबावामुळे अपयश येत आहे. हे असेच सुरू राहणार असून याकडे राजकीय संघर्ष म्हणून पाहिले पाहिजे. बळजबरीने आपले विचार रुजविणाऱ्या धर्माध शक्तींना खऱ्या मारेकऱ्यांचा शोध न घेता केवळ समाजात गोंधळ निर्माण करायचा आहे.’’
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या,की या लढय़ामध्ये आव्हाने खूप आहेत. परंतु त्याप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. डॉ. दाभोलकर यांचा खून झालेल्या ठिकाणी जाते तेव्हा एका क्षणी मन हेलावून जाते, मात्र त्यातूनच पुन्हा लढण्याची प्रेरणा मिळते.
निषेध सभेपूर्वी समितीतर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून निषेध रॅली काढण्यात आली. डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, अतुल पेठे, विनोद शिरसाट, राजू इनामदार, डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या रॅलीची साने गुरुजी स्मारक येथे सांगता झाली.