पिंपरी चिंचवडमधील सांगवी, पिंपळे गुरव या ठिकाणी भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. एटीएममधील १६ बॅटरी या चोरांनी लंपास केल्या आहेत. ज्यांची किंमत १ लाख ७६ हजारांच्या घरात आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टी चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक आणि त्रिमुर्ती येथील एस. बी. आय बँकेच्या एटीएमचे दरवाजे तोडून त्यातील बॅटरी लंपास केल्या. सांगवी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएमदेखील फोडले आहे. याच प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सचिन काळगे याने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

भंगार बाजारात एटीएमच्या बॅटरीला चांगली किंमत मिळते. त्यात तांबे आणि जस्त या दोन धातूच्या प्लेट असतात चोरी केलेल्या बॅटरीच्या अर्धी किंमत चोरांना मिळते. त्याचमुळे या बॅटरी चोरण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा तपास सुरु आहे. मात्र एटीएमजवळ सुरक्षा रक्षक न नेमल्याने असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एका एटीएममध्ये चार ते सहा बॅटरींचा संच असतो, त्यामुळे या परिसरात अशा आणखीही चोऱ्या होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.