पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा गावाजवळ शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास तीन बस एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात तीनजण जखमी झाले. या अपघातामुळे द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली, तर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वलवण गावापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविण्यात आल्याने लोणावळा शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे सुमारे चार ते पाच किमी अंतराच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला त्यांना प्रचंड त्रास झाला.
खंडाळा महामार्ग व लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास एका कंटेनरला ओलांडून पुढे जाणाऱ्या मोटारीचा वेग अचानक कमी झाला. मोटारीला वाचविण्यासाठी त्याच्या पाठीमागे असलेल्या बस चालकाने जोराचा ब्रेक मारला. त्यावेळी मागून भरधाव आलेली शिवनेरी बस ही समोरील बसवर मागून जोरात आदळली. तिच्या पाठीमागे असलेली नॅशनल कंपनीची बस ही शिवनेरीवर आदळल्याने हा विचित्र अपघात झाला. यामध्ये शिवनेरीचा ड्रायव्हर संदीप नारायण लोखंडे व प्रवासी सुरभी भरत देसडला यांच्यासह नॅशनल बसचा चालक जखमी झाला आहे. या अपघातातील पहिल्या बसमध्ये पुण्यातील एका चर्चमधील चाळीस मुले होती. सुदैवाने त्यापकी कोणालाही कसलीही इजा झाली नाही ही सर्व मुलं त्यांच्या शिक्षकांसह मुंबईला एका कार्यक्रमासाठी निघाली होती. अपघातानंतर घटनास्थळी पोहचलेले महामार्ग पोलीस व आयआरबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यास क्रेनच्या साहाय्याने सुरुवात केली. मात्र अपघातानंतर वाहनांचे चाक अचानक लॉक झाल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. वाहने मार्गातून बाजूला करण्यास विलंब झाल्याने द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याकरिता द्रुतगती महामार्गाने मुंबईकडे जाणारी वाहतूक वलवण येथे बंद करून वाहतूक जुन्या महामार्गावर वळविण्यात आली. लोणावळ्यात अचानक वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर तीन ते चार किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी साडेअकरा वाजता द्रुतगती महामार्गावरील व बारा वाजता जुन्या महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.