विसर्जन मार्गावर ११८ सीसीटीव्ही कॅमेरे, बॉम्बशोधक पथक; न्यायालयीन आदेशाचा भंग करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करणार

वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह प्रमुख नऊ विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी मनोरे, बॉम्बशोधक पथक, शीघ्र कृतिदल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा असा बंदोबस्त राहणार आहे.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांनी बैठकांद्वारे संवाद साधला आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेत मिरवणूक संपविले जाईल, असे आश्वासन पोलिसांना दिले आहे. गेल्या काही वर्षांत विसर्जन मिरवणुकीतील बंदोबस्तातील उणिवा विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, डॉ. प्रवीण मुंढे, दीपक साकोरे, गणेश शिंदे या वेळी उपस्थित होते.

बंदोबस्ताबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त वाकडे म्हणाले, की गुरुवारी (१५ सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास मंडईतील टिळक पुतळा चौकातून प्रथेप्रमाणे मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणुकीचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण मार्गाची बॉम्बशोधक पथकातील तेरा श्वानांकडून तपासणी करण्यात येईल.

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, क र्वे रस्ता, शास्त्री रस्त्यांसह खडकी, लष्कर, कात्रज, पिंपरी-चिंचवड भागातील विसर्जन मिरवणुकांसाठी दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, १७ पोलीस उपायुक्त, ३९ सहायक आयुक्त, १८४ पोलीस निरीक्षक, ६६९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ७ हजार ६०५ पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा, शीघ्र कृतिदलाच्या आठ तुकडय़ा, गृहरक्षक दलातील ५०० जवान, प्रशिक्षणार्थी पोलीस असा नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण शहरात तैनात करण्यात येणार आहे.

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यासाठी विशेष बंदोबस्त

लक्ष्मी रस्ता तसेच टिळक रस्त्यावरून सर्वाधिक मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. लक्ष्मी रस्त्यावर जवळपास ११५५ पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांसाठी यंदा विश्व हॉटेल चौकातून मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तेथे दोन पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त वाकडे यांनी दिली.

लक्ष्मी रस्त्यावर पादचारी मार्ग

लक्ष्मी रस्त्यावर यंदाही पादचाऱ्यांसाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोलिसांनी पादचारी मार्गावर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत. मध्यभागात तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदाही रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर तेरा मनोरे, ११८ सीसीटीव्ही कॅमेरे असून छेडछाड, चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथकही राहणार आहे.

  • गर्दीत चालताना मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे
  • अफवांवर विश्वास ठेवू नये
  • बेवारस वस्तूंना हात लावू नये
  • संशयितांची माहिती पोलीस नियंत्रण कक्षात (दूरध्वनी- १००) कळवावी