३५ लाख लोकसंख्येच्या शहरात ३६ लाखांवर गाडय़ा

गेल्या काही वर्षांपासून राज्यातच नव्हे, तर देशातील कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यात वाहन वाढीचा वेग सर्वाधिक आहे. पुण्याची भीषण वाढत चाललेली वाहतूक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच अभिमानास्पद नसली, तरीही आता पुण्यात वाहनांच्या संख्येने लोकसंख्येचाही आकडा ओलांडला आहे. २०१७- २०१८ या आर्थिक वर्षांमध्ये एकटय़ा पुणे शहरात दोन लाख ८९ हजार ९१० नवी वाहने दाखल झाली. त्यात दुचाकींची संख्या ऐंशी टक्क्य़ांहून अधिक म्हणजेच तब्बल दोन लाख पाच हजार अशी आहे. या वाहनवाढीमुळे शहरात एकूण वाहनांची संख्या आता ३६ लाख २७ हजार २८० इतकी झाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या आसपास आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी वाहनांची आकडेवारी जाहीर केली. पुणे शहरातील वाहन वाढीचा विषय सातत्याने चर्चेत येत असतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष यापूर्वीही अभ्यासकांनी काढला आहे. मात्र, शहरात अंदाजापलीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याचे आरटीओच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. विशेषत: शहरांतर्गत प्रवासाची वैयक्तिक गरज लक्षात घेता दुचाकींची संख्या झपाटय़ाने वाढली आहे.

३१ मार्च २०१७ पर्यंत शहरात एकूण वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार होती. त्या वेळी शहरात माणसी एक वाहन असे प्रमाण होते. वाहनांची संख्या आता ३६ लाख २७ हजारांच्याही पुढे गेली आहे. दुचाकींची संख्या २४ लाख ९७ हजारांहून २७ लाखांच्याही पुढे गेली आहे. यंदा दुचाकी वाढीचे आणि  शहरात एकूणच वाहन वाढीचे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. दुचाकींपाठोपाठ चारचाकी वाहनांची संख्याही शहरात वाढली आहे. मागील वर्षांत शहरात ५ लाख ८९ हजार चारचाकी वाहने होती. त्यात यंदा ५६ हजार ४०१ वाहनांची भर पडली असून, सध्या चारचाकींची संख्या ६ लाख ४५ हजारांच्याही पुढे गेली आहे. एकूण वाहनांचा विचार करता शहरात दुचाकी वाहने आघाडीवर आहेत. त्यामुळेच देशातील सर्व शहरांच्या तुलनेत वाहन वाढीचा वेग पुण्यात सर्वाधिक ठरतो आहे. तर मुंबईसह राज्यातील कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यात एकूण वाहनांची संख्या सर्वाधिक झाली आहे.

रिक्षाही वाढल्या

मागील अनेक दिवसांपासून बंद करण्यात आलेले रिक्षाचे नवे परवाने मागील वर्षांपासून खुले करण्यात आल्याने परिणामी रिक्षांची संख्याही शहरात वाढली आहे. पुण्यात मागील आर्थिक वर्षांपर्यंत एकूण ४५ हजार ५ रिक्षा होत्या. त्यात पहिल्यांदाच वाढ होत रिक्षांची संख्या आता ५३ हजार २२७ झाली आहे. त्यानुसार वर्षभरात शहरातील रस्त्यांवर ८ हजार २२३ नव्या रिक्षा दाखल झाल्या. त्याचप्रमाणे अ‍ॅपवर चालणारी कॅब आणि हॉटेल, कंपन्यांमधील कॅबच्या सुविधेमुळे कॅबची संख्याही यंदा वाढली आहे. मागील वर्षांपर्यंत शहरात २२ हजार ६९६ कॅब होत्या. वर्षभरात त्यात ५ हजार ६४८ कॅबची भर पडली आहे.

  • पुण्याची लोकसंख्या : ३५ लाख
  • एकूण वाहने : ३६ लाख २७ हजार २८०
  • दुचाकी : २७ लाख ३ हजार १४७
  • चारचाकी : ६ लाख ४५ हजार ६८३
  • रिक्षा : ५३ हजार २२७
  • टॅक्सी कॅब : २८ हजार ३४४
  • ट्रक : ३८ हजार ५९८