नियोजनासाठी ९८० वाहतूक पोलीस

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. त्यामुळे उपनगरात जाणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहतूक पोलिसांनी यंदा वर्तुळाकार मार्ग योजना आखली आहे. या योजनेत उपनगरातील नागरिकांची सोय होणार असून, उपनगरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच जड वाहने शहरात न येता परस्पर बाहेरगावी जाऊ शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नियोजनासाठी ९८० वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर विसर्जनाच्या दिवशी वर्तुळाकर रस्ता (रिंग रोड) ही योजना राबविली होती. ही योजना यंदा व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. विसर्जनाच्या दिवशी बाहेरगावाहून येणारे वाहनचालक गोंधळून जातात. त्यामुळे उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी वतुर्ळाकार मार्ग योजनेचा नकाशा आणि त्याची माहिती देणारे फलक लावले आहेत. जड वाहनांनी मध्यभागात न येता उपनगरातील वर्तुळाकर मार्गाचा वापर करून शहराबाहेर पडावे, असा या योजनेचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

यंदा वर्तुळाकार मार्ग योजनेचे वीस फलक लावण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता या रस्त्यांसह प्रमुख १४ रस्ते बंद राहणार आहेत. अशा वेळी शिवाजीनगर भागातील एखाद्या वाहनचालकाला कोथरूडकडे जायचे असेल तर वर्तुळाकर मार्ग योजनेचा वापर करून विधी महाविद्यालय रस्ता मार्गे तो कोथरूडला पोहोचू शकेल. अशाच पद्धतीचे नियोजन शहरासाठी करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

असा असेल वर्तुळाकार मार्ग

शंकरशेठ रस्त्यावरील स्व. चिमणराव ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), गुलटेकडी, वखार महामंडळ चौक, मार्केट यार्ड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, म्हात्रे पूल, नळ स्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संगम पूल, वेलस्ली रस्ता, पुणे स्टेशन, जिल्हा परिषद चौक (बोल्हाई चौक), नेहरू रस्ता, रास्ता पेठ पॉवर हाऊस चौक, संत कबीर चौक, सेव्हन लव्हज चौक असा राहील. वर्तुळाकार मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात येणार आहेत. या मार्गाचा वापर करून वाहनचालक कोथरूड, सिंहगड रस्ता, औंध, बाणेर, पाषाण, नगर रस्ता भागातील उपनगरांत पोहोचू शकतात.

वर्तुळाकार मार्ग असा असेल..

खरी कसरत दुसऱ्या दिवशी

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये, खासगी कंपन्या व सर्वच संस्थांचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी कामाच्या वेळेपूर्वी सकाळी अर्धा ते एक तास घरातून बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांकडून कामाला निघालेल्या वाहनचालकांसाठी रस्ते मोकळे करून देण्यात येणार आहेत.