‘महामेट्रो’च्या कामांमुळे वाहनांचा वेग मंदावला

महामेट्रोच्या कामांमुळे पिंपरी ते खराळवाडी तसेच पुणे मुंबई महामार्गावर काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे वाहनचालकांना वळणे वळणे घेत वाहने चालवावी लागत आहे.

पुणे महामेट्रोचे दापोडी ते पिंपरी पर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे. पुणे मुंबई महामार्गामधून ग्रेड सेपरेटरच्या मध्य भागातून मेट्राचे काम सुरु आहे. त्यामुळे खराळवाडी ते दापोडी दरम्यान वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, खराळवाडी ते चिंचवड रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने मेट्रोच्या कामाचा अडथळा वाहन चालकांना होत आहे.

खराळवाडीपासून मोरवाडीपर्यंत बीआरटी रस्त्याच्या बाहेरुन मेट्रोचे खांब उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोने रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी कठडे लावले आहेत. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे.

अनेकदा होतोय वाहतूकीचा खोळंबा

पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या समोर मेट्रोचे काम सध्या सुरु आहे. महापालिका भवनाजवळ महापालिका इमारतीच्या बाजूने कठडे लावण्यात आले आहेत. पालिकेत जाण्याच्या मार्गापासून ते मोरवाडी चौकापर्यंत ग्रेड सेपरेटरच्या बाजूने कठडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वळणे वळणे घेत प्रवास करावा लागतो. याशिवाय मोरवाडीपासून पुढे चिंचवडकडे जातानाही अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा वाहतूक खोळंबण्याचे प्रकार घडत आहेत.