टाळेबंदीत कडाडलेल्या भाज्यांचे दर पूर्वपदावर

पुणे : शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर भाज्यांच्या मागणीत वाढ झाली. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर कडाडले. मार्केट यार्डातील मुख्य भाजीपाला बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर गेले आठवडाभर तेजीत असणाऱ्या भाज्यांचे दर पूर्वपदावर येऊ लागले आहेत. भाज्यांच्या दरात घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

शहरात गेल्या मंगळवारी (१४ जुलै) प्रशासनाने पुन्हा टाळेबंदी लागू केली. टाळेबंदीत मार्केट यार्डातील मुख्य भाजीपाला बाजार, भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोशी, मांजरी, उत्तमनगर, खडकी येथील उपबाजार बंद ठेवण्यात आल्याने शहरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला खरेदी केला. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडू लागल्याने भाज्यांचे दर दुपटी-तिपटीने वाढले होते. किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे एक किलोचे १०० ते १२० रुपयांच्या पुढे गेले होते. एक किलो टोमॅटोला १०० रुपये असा दर मिळाला होता. टाळेबंदीतील पहिले पाच दिवस प्रशासनाने कडक निर्बंध घातले होते. त्यानंतर गेल्या रविवारपासून  सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत भाजीपाला, किराणा माल विक्रीची दुकाने खुली करण्यास प्रशासनाने मुभा दिली.

टाळेबंदी लागू होण्यापूर्वी भाज्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. पहिले पाच दिवस कडक निर्बंध असल्याने किरकोळ भाजीपाला विक्रीची दुकाने बंद होती. नागरिकांनी भीतीपोटी खरेदी केली. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडू लागल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले होते. मुख्य भाजीपाला बाजार सुरू झाल्याने भाज्यांचे दर कमी होत आहेत.

– प्रकाश ढमढेरे, किरकोळ  बाजारातील भाजीपाला विक्रेते

 

     टाळेबंदीतील भाज्यांचे  किलोचे दर               बुधवारचे दर

बटाटा        ६० ते ७० रुपये                                  ३५ ते ४०  रुपये

टोमॅटो       ८० ते १०० रुपये                                ५० ते ६० रुपये

कांदा          ४० रुपये                                          २५ ते ३० रुपये

मटार          १५० रुपये                                        ९० ते १०० रुपये

भेंडी           १०० रुपये                                          ८० रुपये

गवार          १०० रुपये                                         ७० ते ८० रुपये

फ्लॉवर       ८० ते १०० रुपये                               ७० ते ८० रुपये

कोबी           ८० रुपये                                          ४० ते ५० रुपये

कोथिंबीर    ३० ते ५० रुपये                                 १० ते १५ रुपये

(एक जुडी)