नऊ वर्षांपासून सहापदरीकरणाच्या कामाची रखडपट्टी झालेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील खेड- शिवापूर टोल नाक्यावर रविवारीही टोल भरण्यासाठी सकाळपासून मोठय़ा रांगा लागल्या होत्या. ‘फास्टॅग’द्वारे टोल भरण्याच्या पहिल्याच दिवशीही ठेकेदाराच्या योग्य नियोजनाअभावी वाहनधारकांना बराच वेळ रांगांमध्ये अडकून पडावे लागले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम नऊ वर्षांपासून रखडले आहे. अपूर्ण कामे आणि रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाला असला, तरी टोलची वसुली मात्र जोमाने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत टोल पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. या रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील मोठमोठय़ा रांगांचा अनुभव नागरिकांना रोजचा झाला आहे. रविवारपासून ‘फास्टॅग’द्वारे टोल भरण्याची सुविधा या नाक्यावरही सुरू करण्यात आली. मात्र, नियोजन नसल्याने वाहनांच्या रांगांमध्ये भर पडल्याचे चित्र दिसून आले.

अनेक वाहनांना अद्यापही  ‘फास्टॅग’ बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे रोख पैसे भरून टोल भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रोख पैसे भरण्यासाठी आणखी सुमारे महिन्याची मुदत देण्यात आली आहे. असे असतानाही टोलचे पैसे रोखीने भरणाऱ्यांसाठी अपुऱ्या मार्गिका ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मार्गिकांवर मोठ-मोठय़ा रांगा लागून प्रवासी त्यात अडकून पडले होते. अनेकदा सुटीचे दिवस किंवा दररोज संध्याकाळनंतर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असतात. रविवारी मात्र दिवसभर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.