घरच्या घरी संगीत सरावाची संधी उपलब्ध करून देणारे ‘विश्वमोहिनी वेब अॅप’ गेल्या तीन महिन्यांत सातशेहून अधिक जणांनी ‘डाऊनलोड’ करून घेतले आहे. ‘विश्वमोहिनी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून मोफत डाऊनलोड करून घेतल्यानंतर ग्रामीण भागात लॅपटॉपवर इंटरनेटविनाही हे अॅप वापरता येऊ शकते.
संगीतप्रेमी युवा सॉफ्टवेअर इंजिनीअर शिवराज सावंत या युवकाने ह्य़ा अॅपची निर्मिती केली आहे. पं. विजय दास्ताने, पं. मुकेश जाधव आणि पं. शशिकांत बेल्लारे यांच्याकडून शिवराज सावंत यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले आहे. संगीताच्या प्रेमापोटी त्यांनी विकसित केलेले अॅप संगीत शिकणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
अॅपविषयी माहिती देताना सावंत म्हणाले,‘‘विश्वमोहिनी मेलडी प्लेअर’मध्ये गुरुजींनी शिकविलेल्या बंदिशींचे स्वरलेखन (नोटेशन्स) करू शकतो. या नोटेशन्स वाजवू शकतो आणि त्या मित्रांना ‘शेअर’ही करू शकतो. त्याचप्रमाणे सूर आणि तबला घेऊन नव्या स्वररचना करू शकतो. ताल आणि आवर्तन याची निवड करून ही स्वररचना करता येते. हे वेब अॅप संगीत शिकणारे विद्यार्थी, कलाकार आणि संगीतप्रेमींसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनीअिरगच्या अभ्यासाचा उपयोग करून संगीताच्या प्रचारासाठी हे वेब अॅप विकसित केल्याचे समाधान लाभले आहे.