रुग्णालयांकडून रुग्णांच्या काय अपेक्षा?

खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून रुग्णांच्या काय अपेक्षा आहेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुण्यात जूनच्या अखेरीस मतदान घेण्यात येणार आहे. सोसायटय़ा, महाविद्यालये, सरकारी रुग्णालये व मोठय़ा संघटनांच्या मदतीने हे मतदान घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वैद्यकीय व्यवस्थेविषयी रुग्णांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास आणि डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून ठिकठिकाणी झालेल्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर ‘जन आरोग्य अभियान’ या संघटनेने ‘आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा’ ही मोहीम सुरू केली आहे. ‘रुग्णांची फसवणूक थांबवण्यासाठी खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणणे व उपचारांच्या दरांमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे वाटते का, सरकारी दवाखान्यांच्या सेवेत तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का आणि रुग्णांचे तक्रार निवारण व रुग्ण हक्कांचे संरक्षण यासाठी सरकारने कायदा करायला हवा का,’ हे तीनच प्रश्न या मतदानात विचारण्यात येणार आहेत. त्यांची नागरिकांनी ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे देऊन आपले मत नोंदवायचे आहे, असे संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

संघटनेचे डॉ. अभिजित मोरे म्हणाले,‘‘ ‘वैद्यकीय आस्थापना कायद्या’चे विधेयक बऱ्याच काळापासून पडून आहे. हा कायदा आणि रुग्ण हक्कांची सनद अमलात आणणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीही वेगळी यंत्रणा हवी. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना कुठूनही औषधखरेदी करण्याची मुभा मिळणे, रुग्णाला त्याचा वैद्यकीय अहवाल रुग्णालयातून ७२ तासांत उपलब्ध होणे, ‘सेकंड ओपिनिअन’ घेण्याचा त्यांचा हक्क अबाधित राहणे व आणीबाणीच्या वेळी अडवणूक न होता तातडीचे उपचार मिळणे गरजेचे आहे.’’

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://goo.gl/forms/PefLlr7vYdpunjh72 या लिंकवर नोंदणी करता येईल किंवा ८७९६६५०९८२ या दूरध्वनी क्रमांकावर मिसकॉल देऊन नोंदणी होऊ शकते. संस्थेला या मोहिमेसाठी कार्यकर्ते व आर्थिक मदतीचीही गरज आहे. नागरिकांना ९१५८४९४७८४, ७५८८०३२२१८, ९९७०२३१९६७ या दूरध्वनी क्रमांकांवर सविस्तर स्वरूपात संवाद साधता येईल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

सेल्फी विथ डॉक्टर’!

याच मोहिमेचा एक भाग म्हणून नागरिकांनी त्यांच्या डॉक्टरांना ‘जादू की झप्पी’ (आलिंगन) द्यावे व डॉक्टरांबरोबर ‘सेल्फी’ काढावा, असाही उपक्रम सुरू करण्यात आला आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात आपला पाठिंबा नोंदवण्यासाठी हा सेल्फी ८७९६६५०९८२ या दूरध्वनी क्रमांकावर ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर पाठवावा व तो समाजमाध्यामांवर ‘शेअर’ केला जाईल, असे सांगण्यात आले.

या उपक्रमाबद्दल संस्थेतर्फे ‘आयएमए’ला कळवण्यात आलेले नाही, परंतु वैद्यकीय आस्थापना कायद्यातील तरतुदी डॉक्टर व रुग्णांसाठी मारक ठरणाऱ्या असतील तर आमचा त्या कायद्यास विरोध आहे. पश्चिम बंगालच्या वैद्यकीय आस्थापना कायद्यात डॉक्टरांना शिक्षेची तसेच लाखोंच्या नुकसानभरपाईची तरतूद आहे. अशा गोष्टींना तसेच सरकारी अधिकाऱ्यांना या कायद्यात अमर्याद अधिकार मिळणार असतील, तर त्याला विरोधच आहे.

डॉ. प्रकाश मराठे, अध्यक्ष, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, पुणे शाखा