पालिकेच्या पाणी कपातीमुळे अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठय़ाने नागरिक हैराण

िपपरी महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा धोरण जाहीर करताना निर्धारित केलेली २५ टक्के पाणीकपात कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त कपात होत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. पाणीवाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून रणरणत्या उन्हाळ्यात अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठय़ाने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत, याकडे सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह बहुतांश वरिष्ठ अधिकारी स्थायी समितीच्या बैठकीस गैरहजर राहिल्याने सभापती डब्बू आसवानी व अन्य सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संजय वाबळे तसेच कैलास थोपटे यांनी, पाणीकपातीचे धोरण फसवे असल्याची टीका केली. भोसरी-इंद्रायणीनगर, रहाटणी-काळेवाडीसह शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. जाहीर केलेल्या वेळेपत्रकानुसार पुरवठा होत नाही. दिवसाआड पाणी देत असताना ५० टक्क्य़ांपर्यंत कपात परस्पर वाढवण्यात आली, असा आक्षेप सदस्यांनी घेतला. यासंदर्भात, उत्तर देण्यासाठी आयुक्त वाघमारे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही नव्हते. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय, शहरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्सचा विषय धनंजय आल्हाट तसेच शुभांगी लोंढे यांनी उपस्थित केला.  या विषयाशी संबंधित अधिकारी बैठकीत नसल्याने पुढील बैठकीत याबाबतची माहिती देण्याची सूचना सभापतींनी देताना अनुपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे आसवानी यांनी पत्रकारांना सांगितले.

१४ मोटारी जप्त

महापालिकेच्या नळजोडणीस थेट विद्युत मोटार लावून बेकायदेशीरपणे पाण्याचा उपसा करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या भरारी पथकाने १४ मोटारी जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे बांधकामासाठी पाण्याचा वापर करणाऱ्या तीन नागरिकांचे नळजोडही जप्त करण्यात आले आहेत.