मुठा कालव्यातून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी पर्यायी बोगदा बांधून त्यामार्गे हे पाणी थेट फुरसुंगीजवळ सोडले जाणार असल्याची माहिती शुक्रवारी विधान परिषदेत देण्यात आली.
मुठा कालव्यातून वर्षांला तीन टीएमसी पाण्याची गळती होते. ती थांबवण्यासाठी काय उपाययोजना केली जात आहे, असा तारांकित प्रश्न आमदार मोहन जोशी यांनी विचारला होता. महापालिकेला प्रत्यक्ष किती पाणी मिळते, त्यातील किती पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येते, शेतीसाठी किती पाणी दिले जाते, गळती किती होते आदी प्रश्नही जोशी यांनी उपस्थित केले होते.
या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे म्हणाले की, गळती थांबवण्यासाठी कालव्याला पर्यायी बोगदा बांधण्याची योजना आहे. हा कालवा पुणे शहराच्या बाहेरून बोगद्यामार्फत वळवून फुरसुंगी जवळ शहराच्या बाहेर नवीन मुठा कालव्यास मिळवण्याचे नियोजन आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून तो तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सादर करण्यात आलेला आहे.
कालवा पूर्णपणे उघडा असून शहरातील नागरिक त्यात मोठय़ा प्रमाणावर कचरा, भंगार व जुन्या वस्तू टाकतात. तसेच कालव्यात कपडे धुणे, वाहने धुणे असेही प्रकार होतात. त्यामुळे कालव्याचे पाणी प्रदूषित होते. या प्रदूषणावर महापालिकेने नियंत्रण ठेवावे. हे नियंत्रण जलसंपदा विभाग ठेवू शकणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. कालव्याच्या लगत पर्वती, हडपसर, वानवडी, घोरपडी वगैरे भागात अतिक्रमणे झालेली असून या अनधिकृत झोपडय़ांना नळ, विजेचे मीटर तसेच सार्वजनिक शौचालये आदी सुविधा महापालिकेने दिलेल्या असल्यामुळे ही अतिक्रमणे हटवणे जिकिरीचे होत आहे. त्याबाबत महापालिकेला वारंवार कळवण्यात आले आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.
नवीन मुठा कालव्याच्या बांधकामाला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून कालव्याच्या काठाकडील भागाची बऱ्याच ठिकाणी पडझड झाली आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीसाठी निधी कमी प्रमाणात मिळत असल्याचीही माहिती जलसंपदा विभागाने आमदार जोशी यांना दिली आहे.

राज्य शासन म्हणते..
– गळती थांबवण्यासाठी बोगद्याचा पर्याय
– कालव्यातील प्रदूषण महापालिकेने थांबवावे
– अनधिकृत बांधकामांनाही पालिकाच जबाबदार