राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले तसेच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक सुरु असून तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे विधान केले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, धगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित आहेत.

जयंत पाटील म्हणाले, १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची नावं आत्ताच मी उघड करणार नाही कारण त्यांच्यासाठी ते अडचणीचं होईल. आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरिट भरती करु असेही पाटील यावेळी म्हणाले. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे हे अद्याप शरद पवारांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, कोणाला पाठींबा द्यायचा यापेक्षा सरकार कोणाचं होईल याबाबत चर्चा होईल असं वाटतं. किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही अद्याप अंतिम झालेला नाही, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर बोलताना भाजपाची विचारधारा वेगळी असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही, असे पाटील म्हणाले. मग शिवसेनेसोबत कसं जाणार? या प्रश्नावर दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. थोडासा उशीर झाला तरी चालेल पण राज्यात एक मजबूत आणि पाच वर्षे टिकणारं सरकार आलं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.