सरदार मुजुमदार वाडय़ातील घटना

पुणे : एका युवकाने जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये पडलेल्या मांजरीच्या पिलाला ‘अक्षय’ जीवदान दिल्याची घटना मंगळवारी घडली. कसबा पेठ येथील सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाडय़ामध्ये असलेल्या विहिरीमध्ये तीस फूट खोल असलेल्या पाइपमध्ये अडकून पडलेल्या मांजरीच्या पिलाला अक्षय शेलार याने तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले.

शनिवार वाडय़ालगतच सरदार आबासाहेब मुजुमदार यांचा २३० वर्षांपूर्वीचा वाडा आहे. या वाडय़ामध्ये असलेल्या विहिरीमध्ये मंगळवारी सकाळी मांजरीचे पिलू पडले. सरदार मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांच्या कानावर घाबरलेल्या मांजराच्या पिलाचा आवाज ऐकू आला. त्यांनी तत्काळ नगरसेवक योगेश समेळ यांच्याशी तसेच अग्निशामक दलाशी संपर्क साधला. ही विहीर पन्नास फुटांहून अधिक खोल आहे. अंधार असल्यामुळे मांजरीचे पिलू दिसत नव्हते. फक्त त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.  अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट दिली. भोई आळी येथे राहणारा अक्षय शेलार तेथे आला. गिर्यारोहक असलेल्या अक्षयने पाहणी केल्यानंतर घरी जाऊन दोर आणला. दलाच्या जवानांच्या मदतीने तो विहिरीमध्ये जवळपास तीस फूट खोल उतरला. आवाज येत असला तरी मांजराचे पिलू काही केल्या सापडत नव्हते. मांजराचा शोध घेत असताना त्याला कात्रज येथील तलावातून विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी त्या काळी टाकण्यात आलेले तीन पाइप दिसले. त्यातील एका पाइपमध्ये हे पिलू जाऊन बसले होते. अक्षयने ते पकडून बाहेर काढले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने अक्षय आणि मांजरीचे पिलू दोघेही सुरक्षितपणे बाहेर आले. तेव्हा वाडय़ामध्ये जमललेल्या सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला.

जवळपास दोनशे वर्षांची विहीर

सरदार मुजुमदार वाडा २३० वर्षांपूर्वीचा असला, तरी वाडय़ातील विहीर नंतर बांधण्यात आली आहे. १८२९ साली विहीर फोडण्याचे काम सुरू झाले. ते एक वर्षभर सुरू राहिले. विहीर बांधण्यासाठी दोनशे रुपये कर्ज घेतले होते. विहीर बांधणीसाठी १७१ रुपये खर्च आला, अशी माहिती अनुपमा मुजुमदार यांनी दिली. काम पूर्ण झाल्यानंतर विहिरीचे पूजन करण्यात आले. विहिरीसाठी पाणी कात्रजवरून आणण्यात आले. विहिरीच्या पहिल्या पाण्याने मोरयास अभिषेक करण्यात आला होता. महापालिकेची नळ योजना सुरू झाल्यानंतर विहिरीचा वापर कमी झाला. पानशेतच्या पुरामध्ये या विहिरीच्या पाण्याने परिसरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर केली, असे मुजुमदार यांनी सांगितले.