पिंपरी- चिंचवड : चोविसावाडी येथील ११ वर्षीय मुलाचा हाउसिंग सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना दसऱ्याच्या दिवशी घडली. या प्रकरणात दिघी पोलिसांनी लिफ्टच्या कंपनीकडे तांत्रिक अहवाल मागितला आहे. तसेच याप्रकरणी तज्ज्ञ समितीचे मत (एक्सपर्ट ओपिनियन) देखील मागविले आहे.

अमेय साहेबराव फडतरे (वय ११, रा. चोविसावाडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिघीचे पोलिस निरीक्षक विनायक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लिफ्ट नादुरुस्त होती, तांत्रिक बिघाड झाला होता का याबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित लिफ्टच्या कंपनीकडे पत्रव्यहार करण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल कंपनीकडून मागवण्यात आला आहे. तसेच पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होता किंवा नाही याबाबत सीओईपीकडून एक्सपर्ट ओपिनियन मागविण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. अमेय फडतरे हा मुलगा लिफ्टमध्ये अडकून जखमी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. यातील तांत्रिक बाबी देखील तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.