मुंबई, पुणे : राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक (२११) असली तरी निकालात घट झाल्याने यंदा अकरावी प्रवेशासाठीचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) दोन ते तीन टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळी मुंबई, पुण्यातील नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठीची अटीतटी कायम असेल.
तुलनेने यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचीच संख्या कमी झाल्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची वेळ येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली आहे. त्याचबरोबर विशेष श्रेणीतील (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) विद्यार्थ्यांची संख्या ६९ हजारांनी तर प्रथम श्रेणीतील (६० ते ७५ टक्के) विद्यार्थ्यांची संख्या ही साडेचौतीस हजारांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्वितीय श्रेणीतील (४५ ते ६० टक्के) विद्यार्थी ४५ हजारांनी तर उत्तीर्ण श्रेणी म्हणजेच ३५ ते ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २० हजारांनी वाढली आहे. त्यामुळे यंदा अगदी मोजकी महाविद्यालये सोडून बाकी महाविद्यालयांतील प्रवेशाची वाट सुकर होण्याची शक्यता आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून
गेल्या वर्षीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच विभागांपुरती मर्यादित असलेली अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात येणार (पान ४ वर)(पान १ वरून) आहे. विद्यार्थी नोंदणी पूर्ण झाल्यावर संस्थांतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्याक या राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानंतर प्रवेशाच्या चार फेऱ्या राबवल्या जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालये ११ ऑगस्टला सुरू होतील.
नामांकित महाविद्यालयांसाठी चढाओढ
यंदा राज्यातील ८१ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे यंदा नामांकित महाविद्यालयांतील चढाओढ कायम असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि आयसीएसीच्या राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यंदा राज्यातील १ लाख १३ हजार सीबीएसईचे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील साधारण २० टक्के विद्यार्थी हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे आहेत. त्याशिवाय आयसीएसईचे २९ हजार ५२४ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
‘निकाल घटल्यामुळे एक ते दोन टक्क्यांनी पात्रता गुण कमी होऊ शकतात. यंदा राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असली, तरी पुण्यातील प्रवेशांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. राज्याच्या इतर भागांतील काही विद्यार्थी दर वर्षीच पुणे शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असतात,’ असे स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड म्हणाले.
‘दहावीचा निकाल वाढल्यास किंवा घटल्यास अकरावीच्या पात्रता गुणांमध्ये थोडा फार फरक पडतो, असा दर वर्षीचा अनुभव आहे. त्यानुसार यंदा निकाल घटल्यामुळे पात्रता गुण एक ते दीड टक्क्याने कमी होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत इंटिग्रेडेट प्रकारच्या महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांनाही नामांकित महाविद्यालयांत प्रवेशाची संधी मिळू शकते,’ असे फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी. डी. कुंभार यांनी सांगितले.
‘इंटिग्रेटेड’चे आव्हान
अभियांत्रिकी प्रवेशासाठीची ‘जेईई’, वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ‘नीट’ अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी शिकवणी लावतात. त्यातूनच ‘इंटिग्रेटेड’ प्रकाराचा उदय झाला आहे. त्यात फारशा नामांकित नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थी अशा महाविद्यालयाशी ‘सामंजस्य’ केलेल्या शिकवणी वर्गात पूर्ण वेळ बसतात. या इंटिग्रेटेड प्रकारावर कोणत्याही प्रकारे शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार बोकाळल्याचे चित्र आहे.
मुळातच यंदा दहावीच्या परीक्षेसाठीची नोंदणी केलेले विद्यार्थी हे गेल्या वर्षीपेक्षा साधारण दोन हजारांनी कमी होते. त्यातच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीही घटली आहे. त्यामुळे नवख्या, छोट्या महाविद्यालयांना तुकड्या वाचवण्यासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ येणार आहे.
राज्यात दहावीचा निकाल ९४ टक्के
पुणे : इयत्ता बारावीपाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालही यंदा घटला. यंदा ९४.१० टक्के लागला असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत १.७१ टक्क्यांनी कमी आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर नागपूर विभागाचा सर्वांत कमी ९०.७८ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती.
‘सीबीएसई’ दहावी, बारावीच्या निकालात वाढ
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेचा निकाल ९३.६६, तर बारावीचा निकाल ८८.३९ टक्के लागला आहे. तर ‘सीबीएसई’चा महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९६.६१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालात किंचित वाढ झालेली आहे.