करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीपासून थकबाकीदार वीज ग्राहकांवरील कारवाई थांबविण्यात आली होती. मात्र, आता थकबाकीदारांची वीज तोडण्याची कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील अकृषक ग्राहकांकडे सध्या १३२९ कोटींची थकबाकी असून, पश्चिम महाराष्ट्रातील थकबाकीचा आकडा २३५९ कोटींवर गेला आहे. सर्वच वर्गवारीतील ग्राहक मिळून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील वीज देयक थकबाकीचा डोंगर ६३ हजार ७४० कोटींवर पोहोचला आहे.

मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्वच नागरिक घरी असल्याने थकबाकी असल्यास वीज तोडण्याची कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे मीटर वाचन थांबवून सरासरी देयके देण्यात आली. या काळातच वीजदरवाढ लागू झाली. त्यामुळे वाढीव देयकांबाबत अनेक तक्रारी आल्या. याच कालावधीत कारवाई नसल्याने टाळेबंदीपासून आजवर राज्यातील लाखो ग्राहकांनी एकदाही वीज देयकाचा भरणा केला नाही. त्यामुळे अधिक असलेल्या थकबाकीत मोठी भर पडली. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यंतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ४७ लाख ३० हजार ९०० वीज ग्राहकांकडे सध्या १२५९ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कोलावधीत त्यात सुमारे १५ लाख ग्राहकांची भर पडली असून, थकबाकी ६९३ कोटींनी वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीमध्ये गेल्या तीन महिन्यांत ९ लाख ९ हजार थकबाकीदारांची आणि ३९९ कोटी ४१ लाख रुपये थकबाकीची रक्कम वाढली आहे. सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यातील या अकृषक २३ लाख ८१ हजार ४०० वीजग्राहकांकडे १३२९ कोटी ४८ लाख

रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी चालू वीज देयकांसह थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

देयक भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा

कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च, लघुदाब ग्राहकांना चालू वीज देयकांची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच वीजपुरवठा सुरू असून थकबाकी असणारे ग्राहक आणि तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी ३० टक्के डाऊन पेमेंट करून त्यांना सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुनजरेडणी शुल्क भरून किंवा सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यास नवीन वीजजोडणी घेण्याची सोयही आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1329 crore arrears in pune district except agriculture abn
First published on: 21-01-2021 at 00:00 IST