पुस्तके माणसावर संस्कार करतात आणि आयुष्याची जडणघडण करण्याची प्रेरणा देतात, असे आपण नेहमीच मोठ्या व्यक्तींच्या मनोगतातून ऐकत असतो. एकीकडे किंडलसारखे माध्यम किंवा ऑनलाइन पद्धतीने पुस्तके वाचन करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, नव्या पुस्तकाचा गंध मनात साठवून हातात पुस्तक घेऊन वाचन करण्याने लेखनाचा आशय रुजतो, अशी मानसिकता असलेल्या वाचकांची संख्याही लक्षणीय आहे. वाचनसंस्कृती क्षीण होत आहे, अशी तक्रार केली जात असली, तरी साहित्यनिर्मितीचे नवे अंकुरही पुस्तकरूपाने वाचकांसमोर येत असतात.

श्रावणातील अखेरच्या रविवारी (१७ ऑगस्ट) पुणेकरांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांचा मनभावन श्रावण अनुभवला. शहरात त्या दिवशी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मिळून किमान १५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यामध्ये अभिनेते, राजकारणी, लेखक व्यासपीठावर होते. एकाच वेळी महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यामुळे नेमक्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असा प्रश्नही साहित्यप्रेमींना पडला असेल. या लेखनाचे भवितव्य काय, हे वाचकच ठरविणार असले, तरी इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे, हे अभिजात मराठीसाठी सुचिन्हच म्हणावे लागेल. त्या दिवशी साधारण कोणती पुस्तके प्रकाशित झाली त्याची ही थोडक्यात झलक.

प्रसिद्ध अभिनेते डाॅ. गिरीश ओक यांच्या ‘लोकसत्ता’तील सदरलेखनावर आधारित श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘चिवित्रा’ या पुस्तकाची चौथी आवृत्ती वाचकांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड आणि प्रसिद्ध अभिनेते व खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्यासह श्रीविद्या प्रकाशनाच्या श्रीती कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.

रमेश शिंदेलिखित ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र’, निवृत्त प्रशासकीय अधिकारी गिरीश गोखले यांचे ‘अरे सरकार सरकार’ हे आत्मकथन, संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षणरंग’ व ‘भाषा आणि शिक्षण’, चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘ओव्हरटेक’ हा गूढकथासंग्रह, दीपाली जोगदंड यांचा ‘फन वन’ हा बालकवितासंग्रह आणि घनश्याम पाटील यांचा ‘धडक-बेधडक’ हा राजकीय लेखसंग्रह अशा पुस्तकांचे प्रकाशन करून चपराक प्रकाशनाने सप्तरंगी इंद्रधनुष्य वाचकांसमोर ठेवले. प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे, नाटककार-लेखक अभिराम भडकमकर आणि उद्योजक राम कुतवळ या वेळी उपस्थित होते.

इतिहास विषयाला वाहिलेल्या व मार्वेन टेक्नॉलॉजीजने प्रकाशित केलेल्या अविनाश सोवनीलिखित ‘पुणे शहराचा इतिहास’ आणि सुप्रसाद पुराणिकलिखित ‘पुण्याची समृद्ध बुधवार पेठ’ या पुस्तकांचे प्रकाशन भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे सभागृहात झाले. खासदार मेधा कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चिटणीस पांडुरंग बलकवडे आणि प्रकाशक मनोज केळकर या वेळी उपस्थित होते.

न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णीलिखित ‘मुक्तांची अभंगवाट’ आणि ‘ज्ञाना तू का जनी निळा, नामी गोरा’ या पुस्तकांचे प्रकाशन संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे आणि न्यायमूर्ती एन. के. जमादार यांच्या हस्ते झाले. अनुबंध प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला मुख्य जिल्हा न्यायाधीश एस. के. महाजन आणि प्रकाशक अनिल कुलकर्णी उपस्थित होते. मिहाना पब्लिकेशन्सच्या वतीने अभय अरुण इनामदार यांच्या ‘भूछत्र’ कादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, लेखिका डाॅ. वंदना बोकील-कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे संकलन असलेल्या ‘आवर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. वेदांतश्री प्रकाशनातर्फे हरीश पाचंगेलिखित ‘गोंधळ – एक कुलाचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आळंदी देवस्थानाचे विश्वस्त डाॅ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते झाले. डॉ. व्यंकप्पा सुगतेकर, दादा इदाते, सतीश मोटे, प्रकाशक सुनील उंब्रजकर, संघाचे अध्यक्ष परेश गरुड या वेळी उपस्थित होते. मधुमती संगीत विद्यालयाचे संचालक व तबलावादक नचिकेत मेहेंदळेलिखित ‘चक्रधार’ या पुस्तकाचे प्रकाशन संगीत गुरू डाॅ. माधुरी डोंगरे, आनंद गोडसे, पं. रामदास पळसुले. पं. विजय दास्ताने आणि दयानंद घोटकर यांच्या हस्ते झाले.

‘इतक्या संख्येने पुस्तकांचे प्रकाशन झाले असले, तरी पुस्तकाचा लेखक आणि विषय पाहून वाचकांचा प्रतिसाद मिळताे. विशेषत: वृत्तपत्रांतील पुरवण्यांमध्ये परीक्षणे प्रसिद्ध झाल्यानंतर पुस्तकांना मागणी वाढते,’ असे अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर सांगतात. ‘अनेकदा वाचकांची मागणी आम्हाला प्रकाशकापर्यंत पोहोचण्यास भाग पाडते, असाही अनुभव आनंददायी असतो,’ याकडेही ते लक्ष वेधतात. प्रकाशनानंतरचा हाच अनुभव भाषा संवर्धनासाठी महत्त्वाचा.
vidyadhar.kulkarni@expressindia.com