पुणे : राष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणातून विद्यार्थ्यांची गळती हा कायम चर्चेतील मुद्दा. मात्र, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात यंदा वेगळेच चित्र आहे. तेथे चक्क वयाची साठी उलटलेल्या १७५ उमेदवारांनी यंदा तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.

राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) याबाबतची आकडेवारी दिली. सीईटी कक्षाकडून विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार, सुमारे २३ हजार जागांवर प्रवेश निश्चित झाले. यापैकी १७५ उमेदवार वयाची साठी ओलांडलेले आहेत, तर सर्वाधिक १ हजार ७६७ उमेदवार २१ वर्षे वयाचे आहेत. त्या खालोखाल १ हजार ७५२ उमेदवार २२ वर्षांचे, १ हजार ४०५ उमेदवार २३ वर्षे वयाचे आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत १९ वर्षे वयाच्या ६ उमेदवारांचा, तसेच ७९ वर्षे वयाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. २०२४-२५ मध्ये १६१, तर २०२३-२४ मध्ये १७४ उमेदवार वयाची साठी ओलांडलेले होते.

राज्य सरकारच्या महसूल विभागातून २००४ मध्ये उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले भगवान मोरे यांनी नांदेड येथील सिद्दिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. ‘सध्या माझे वय ८० आहे. निवृत्त असल्याने भरपूर वेळ आहे. मात्र, आपल्याला कायद्याचे ज्ञान असावे, आपण वकील व्हावे, असे वाटत होते. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला,’ असे त्यांनी सांगितले.

‘मी शिक्षक म्हणून काम करत होतो. नंतर केंद्रप्रमुख या पदावरून २००६ मध्ये निवृत्त झालो. पूर्वी विधी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. मात्र, त्या वेळी तो पूर्ण करता आला नाही. त्यानंतर कायद्याचे शिक्षण घ्यायचे राहून गेल्याची खंत वाटत होती. त्यामुळे आता सीईटी परीक्षा देऊन तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला,’ असे सांगली येथील शंकरराव बामणे म्हणाले.

अलीकडील काळात तंदुरुस्तीबाबत सजगता निर्माण झाल्याने अनेकजण वयाची साठी उलटूनही उत्तम पद्धतीने कार्यक्षम असतात. वयाच्या साठीनंतरही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. त्यात निवृत्तीनंतर आवड म्हणून काहींना शिकावेसे वाटते. तसेच, राहून गेलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कौटुंबिक प्रकरणांमुळे गरज म्हणूनही काहीजण विधी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. कामाची गरज म्हणून अभियंते, डॉक्टर अशा क्षेत्रांतूनही अनेकजण कायद्याचे शिक्षण घेतात. – डॉ. दीपा पातूरकर, प्राचार्य, आयएलएस विधी महाविद्यालय

निवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा, असे अनेकांना वाटते. मात्र, कायद्याचे ज्ञान नसल्याने काम करण्यात मर्यादा येतात. अशा वेळी कायद्याचे शिक्षण घेणे उपयुक्त ठरते. कायद्याच्या क्षेत्रात व्यावसायिक म्हणून काम करायला वयाची अट नाही. त्यामुळे साठीनंतर कायद्याचे शिक्षण घेण्यातही अडचण नाही. संबंधितांचा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव, कायद्याचे ज्ञान यामुळे त्यांना आर्थिक फायदाही होऊ शकतो. त्यांचा समाजाला, देशालाही उपयोग होऊ शकतो. – ॲड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ