पुणे : कौटूंबिक वादातून साडूला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या साडूने पुण्यातील खडकी येथील दारुगोळा कारखान्यातून २२ काडतुसे चोरी केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी आरोपी रविंद्र रमेश गोरे (वय ४३ ) याला अटक करण्यात आली आहे. त्यानेच कारखान्यातून काडतूसे चोरी करून साडू गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी ररस्ता चंदननगर) यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. दारुगोळा कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र गोरे आणि गणेश बोरूडे हे दोघे मावस साडू आहेत. ते दोघेही खडकी येथील दारुगोळा कारखान्यात कामाला आहेत. त्या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी कौटूंबिक वाद झाला होता. आरोपी रविंद्र गोरे यांच्या मनात गणेश बोरूडे यांच्या विरोधात प्रचंड राग होता आणि काही करून गणेश बोरूडे यांना गुन्ह्य़ात अडविण्याचा प्लॅन रविंद्र गोरे हे करित होते.
ते दोघे ही दारुगोळा कारखान्यात काम करित असल्याने आरोपी रविंद्र गोरे यांनी काडतुसे चोरण्याचा प्लॅन केला आणि त्यानुसार कारखान्यामधून बाहेर पडताना बुटामध्ये तब्बल २२ काडतुसे चोरली.त्यानंतर ती काडतूसे गणेश बोरुडेंच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली आणि रविंद्र गोरे यांनीच चोरी झाल्याची चर्चा घडवुन आणली. ही माहिती गुप्तचर यंत्रणेपर्यंत पोहचवली. त्यानंतर खडकी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी वेशांतर करुन दारूगोळा कारखान्यातील प्रवेशद्वार क्रमांक १२ मधून बाहेर पडताना गणेश बोरूडे यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे तपासात पुरावे आढळून आले नाही.
त्याच दरम्यान तांत्रिक विश्लेषन करण्यात आले. त्यामध्ये रविंद्र गोरेचे यांचे नाव पुढ आले. त्यानुसार पोलिसांनी रविंद्र गोरे यांना ताब्यात घेतल्यावर मीच गणेश बोरुडे यांच्या दुचाकीच्या डिकीत काडतुसे ठेवल्याची कबुली दिली आणि हे कौटुंबिक वादातून केल्याच त्यांनी सांगितले. त्यानुसार आरोपी रविंद्र गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.