पुणे : गणेश विसर्जनावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आणि अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर फायरमन सेवकांसह जीवरक्षक हे २४ तास तैनात राहणार आहेत. नदीपात्रासह ओढे, नाले परिसरात दुर्घटना घडू नयेत, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रमुख घाटांवर सुरक्षा

अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमाजवळील घाट, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम घाट, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा घाट, चिमा उद्यान (येरवडा), दत्तवाडी घाट व वारजे स्मशानभूमी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या घाटांवर जीवरक्षक, बोटी आणि बचाव साहित्याची व्यवस्था पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

घाटांंच्या परिसरात प्रकाश व्यवस्था

विसर्जन काळात गर्दीच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेकडून विशेष प्रकाश यंत्रणा उभारण्यात आली आहे. शहरातील सर्व भागातील रस्त्यावरील दिव्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. कोणत्याही भागात धोकादायक तसेच गंज लागलेले विजेचे खांब, तुटलेले जंक्शन बॉक्स किंवा फिडर पिलर आढळणार नाहीत याची खबरदारी घेतली जात असल्याचे महापालिकेतील विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

विजेचा धक्का लागण्याची शक्यता असलेले किंवा जीर्ण अवस्थेतील पोल, जंक्शन बॉक्स आढळल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित क्षेत्रीय कार्यालयात माहिती द्यावी. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.