पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार २५० कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधिमंडळात दिली.
महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी १५०० कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाला अधिक गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आमि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित आहे. भूसंपादनासाठी या तालुक्यांच्या प्रांत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली असून त्याला राज्य महामार्गाचा दर्जाही मिळाला आहे. या रस्त्याची लांबी १७२ किलोमीटर असून ११० मीटर रुंदी आहे. प्रकल्पासाठी २३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे.
स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना पाचपट मोबदला
या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन खरेदीखत करण्यात येत आहे. संबंधित गावांची मोजणी पूर्ण करून दरनिश्चिती करण्यात आली आहे आणि त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारमूल्य तक्त्यानुसार (रेडीरेकनर) पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.