पुणे : राज्यात सरकारी आणि खासगी कृषी महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमांच्या एकूण १६ हजार ७६४ जागा असून, त्यापैकी ४ हजार ५५१ जागा रिक्त आहेत. विशेषत: कृषी अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. सरकार एकीकडे कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी मोठमोठ्या घोषणा करीत असताना, दुसरीकडे कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.

राज्यात सरकारी आणि खासगी कृषी महाविद्यालयांत पदवीच्या (बीएस्सी) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून १२ हजार ९२५ जागांवर प्रवेश झाले आहेत, तर ३ हजार ८३९ जागा रिक्त आहेत. एकूण ७७.१० टक्केच प्रवेश होऊ शकले आहेत. कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी ९७६ जागांपैकी ३३६ म्हणजे फक्त ३४.४३ टक्के प्रवेश झाले असून, ६४० जागा रिक्त आहेत. कृषी जैव तंत्रज्ञान शाखेसाठी १ हजार २१ जागांपैकी ५५२ जागांवर म्हणजे ५४.०६ टक्के प्रवेश झाले असून, ४६९ जागा रिक्त आहेत.

आणखी वाचा-नगरपरिषद झाली पण सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी मात्र पालिकेवर, नक्की काय आहे प्रकार

विविध शाखांच्या पदवीच्या एकूण १६ हजार ७६४ जागांपैकी १ हजार ४१३ जागा व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव आहेत. त्यापैकी ७०१ जागा भरल्या आहेत, तर ७१२ जागा रिक्त आहेत. व्यवस्थापन कोट्यासाठी जेमतेम ४९.६१ टक्केच प्रवेश झाले आहेत. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती मिळत नाही, तरीही विविध पात्रता, कागदपत्रांची अट आहे. एसईबीसी प्रवर्गाला जात पडताळणीसाठी सहा महिन्यांची मुदत आहे. मात्र, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली नाही, अशी माहिती एका खासगी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली.

‘नोकरीच्या संधी घटल्याने प्रवेश कमी’

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये पूर्वी कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा असायचा. आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दबदबा वाढला आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षा नियमित होताना दिसत नाहीत. कृषी विभागाची पदभरती वर्षानुवर्षे रखडली आहे. त्यामुळे कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारी आणि खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या वेगाने वाढली आहे. ग्रामीण भागातील कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी फारसे उत्सुक नाहीत. एकीकडे महाविद्यालयांची संख्या वाढली, प्रवेश क्षमता वाढली आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडील ओढा कमी झाला, त्याचा परिणाम म्हणून कृषी पदवीच्या जागा रिक्त राहत आहेत. करोनाच्या साथीनंतर जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे,’ अशी माहिती राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.

आणखी वाचा-महाविकास आघाडीला ‘निर्भय बनो’ चा पाठिंबा, जाहीरनाम्यात मुद्द्यांचा समावेश करण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशस्थिती

बीटेक अन्न तंत्रज्ञान : जागा १३०२, प्रवेश ९१६, रिक्त जागा ३८६
बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन : जागा ९०२, प्रवेश ६०९, रिक्त जागा २९३
बीएस्सी कृषी : जागा ११२६६, प्रवेश ९५९५, रिक्त जागा १ हजार ६७१
बीएस्सी (कम्युनिटी सायन्स) : जागा ५७, प्रवेश ३५, रिक्त जागा २२
बीएस्सी वनशास्त्र : जागा ७७, प्रवेश ७०, रिक्त जागा ७
बीएस्सी उद्यानविद्या : जागा ११२५, प्रवेश ७७४, रिक्त जागा ३५१
बीएस्सी मत्स्यविज्ञान : जागा ३८, प्रवेश ३८