पुणे : शालेय विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता रोखण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षकांनीही जागरूक राहण्याची गरज असल्याची भावना ‘पेस ग्रुप, पुणे’ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. वंदना जोशी यांनी व्यक्त केली. जागतिक शिक्षक दिनानिमित्त ‘सुश्री फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करीत असताना मुखाच्या कर्करोगाने त्रस्त रुग्णांवर आम्ही उपचार करतोच. पण अधिक कर्करुग्ण निर्माण होऊ नयेत यासाठी आम्ही उभारलेल्या लढ्यात जागरूक पालक तसेच शिक्षकांची मिळणारी साथ आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे डाॅ. जोशी म्हणाल्या. या वेळी व्यसनांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीतही दाखविण्यात आली.

सदाशिव मालशे तथा हरिओमकाका यांनी सुरू केलेल्या ‘शिक्षकांची आनंदी दिवाळी’ या उपक्रमांतर्गत राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील २७ शिक्षकांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष होते. व्यसनांपासून जर स्वत:ला रोखायचे असेल आणि चांगल्या सवयींचा अंगीकार करायचा असेल तर सवयींचा त्यात मोठा वाटा असतो. हे विचारात घेऊन या शिक्षकांना ‘सवय तक्ता’ देण्यात आला आणि या सवय तक्त्याच्या माध्यमातून मुलांनी चांगल्या सवयींचा अंगीकार करावा यासाठी एक उपक्रमदेखील शिक्षकांना समजावून सांगण्यात आला.

या वेळी सुश्री फाउंडेशनचे सचिव वैभव रांजणगावकर, खजिनदार जान्हवी ओक तसेच श्रीराम सबनीस, शुभांगी कोपरकर, विजय जोशी, मधुमिलिंद मेहेंदळे, प्रमोद लिमये आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र आवटे, विद्याधर पटवर्धन, विक्रम शिंदे यांच्यासह ‘पुरुष मैत्र गटा’च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.