पिंपरी-चिंचवड शहरासाठी २४ तास पाणीपुरवठा करता यावा, यासाठी २१३ कोटी रुपये खर्चासह नेहरू अभियानातील विविध कामांसाठी ४५९ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांना पालिका सभेने मान्यता दिली आहे.
आगामी काळात शहरासाठी २४ तास पाणी देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. नेहरू अभियानातील कामांचे अहवाल राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ज्या योजनांना मान्यता मिळेल, त्यासाठी केंद्राचा ५० टक्के व राज्याचा २० टक्के निधी अनुदान म्हणून उपलब्ध होईल. त्यादृष्टीने प्रशासकीय मान्यतेसाठी या विषयांची शिफारस पालिका सभेकडे करण्यात आली होती. त्यामध्ये पाणीपुरवठय़ासाठी २१३ कोटी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या हद्दीतील उर्वरित गावांमध्ये मलनिस्सारण नलिका टाकणे ९७ कोटी ३७ लाख, ताथवडे गावच्या पाणीपुरवठय़ासाठी ६५ कोटी ३५ लाख, बसेस व बसथांब्यांसाठी आयटीएस प्रणाली उभारणीसाठी ४९ कोटी ७१ लाख, बीआरटीएस बसस्टेशनसाठी ३३ कोटी ६५ लाख रुपये खर्चाचा समावेश आहे. या प्रस्तावास महापालिका सभेने मंजुरी दिली.