पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट तर्फे सीएसआर अंर्तगत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

गडकरी म्हणाले, शिवसृष्टीनजीक वडगाव ते कात्रज चौक या उड्डाण पुल उभारणीसाठी १३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच कात्रज येथील शिवसृष्टीमार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण करण्यात येणार असून या रस्त्यासाठी ११६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी सेवा रस्ते आणि पादचारी मार्गही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणारा हा प्रकल्प २१ एकर जमिनीवर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ३०२ कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी आतापर्यंत एक हजार ४२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सरकार वाड्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भवानी माता स्मारक, राजसभा, रंगमंडळ व तटबंदीचे काम सुरु आहे. तिसऱ्या टप्यात माची, बाजारपेठ, आकर्षण केंद्र, कोकण, प्रेक्षागृह, अश्वशाळा याचे काम करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ व शाल, श्रीफळ देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर पुरंदरे म्हणाले, कात्रज येथे होणाऱ्या शिवसृष्टीमुळे तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे. या कामासाठी शासनाने केलेल्या मदतीने समाधानी असून यासाठी प्रत्येक घटकाने मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.