रविवार पेठेतील भांडी व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाख रुपयांची रोकड चोरुन पसार झालेल्या कामगाराला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पिंटू शिवलाल सरोज (वय २३, रा. सध्या रा. मंगळवार पेठ. मूळ रा. देवरपटीट भदरी, जि. प्रतापगड,उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत भांडे व्यापारी खेमचंद रिखबचंद पालेशा (वय ६८, रा. गुलटेकडी) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पालेशा यांचे रविवार पेठेतील भांडी बाजारात नाथाली रिखबचंद अँड कंपनी हे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीतून सरोज आणि साथीदाराने प्रवेश करून तिजोरीतील पाच लाखांची रोकड लांबवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरोजने रोकड चोरल्याचा संशय पालेशा यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी सरोजचा शोध सुरू केला. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेतील निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव, राहुल खंडाळे, संदीप तळेकर, घाडगे, शिंगे, आस्मर आदींनी ही कारवाई केली.