पुणे : जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रारूप मतदारयादीवर तब्बल ५८ हजार ६९७ हरकती-सूचना जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ४१८ हरकती-सूचना निकाली काढण्यात आल्या आहेत. एकूण हरकतींपैकी १८ हजार २३४ हरकती उरुळी-फुरसुंगी नगर परिषदेच्या हद्दीतील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आठ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर हरकती-सूचना नोंदविण्यासाठी गेल्या सोमवारपर्यंत (१३ ऑक्टोबर) मुदत देण्यात आली होती. मात्र, हरकती-सूचना नोंदविण्यासाठीचा कालावधी चार दिवसांनी वाढविण्यात आला होता. त्यानुसार हरकती-सूचना नोंदविण्याची मुदत गेल्या शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) संपली. या कालावधीत ५८ हजार ६९७ हरकती-सूचना जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे.

दुबार मतदारांच्या घरी भेटी

दुबार मतदार असल्याच्या सुमारे १५ टक्के तक्रारी असल्यामुळे त्या हरकतींचे निवारण करण्यासाठी मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असून स्थळपाहणीनंतर हरकती निकाली काढण्यात येणार आहेत.

इच्छुकांकडून नव्याने मोर्चेबांधणी

जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण पंधरा दिवसांपूर्वी निश्चित करण्यात आले आहे. आरक्षण लक्षात घेऊन इच्छुकांकडून नव्याने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील चौदा नगर परिषदांपैकी चार ठिकाणी आणि चार नगरपंचायतींपैकी तीन ठिकाणच्या नगराध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे. आठ नगर परिषदांचे नगराध्यक्षपद खुले आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडाही जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.