महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरची मुदत आहे.

हेही वाचा >>>पुणे: डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाच्या अद्ययावत नाट्यगृह उभारणीत कुटुंबाचे योगदान

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पूर्वीप्रमाणे परीक्षा होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षांच्या अधिसूचनेसह परीक्षेचे वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले.

हेही वाचा >>>सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींच्या फोटोला ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’कडून जोडे मारो आंदोलन

अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी १२ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. त्यात १५ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह, १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, तर २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज करता येईल. ३१ डिसेंबरनंतर अर्ज भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.