पुणे : गणेशोत्सवात घातक लेझर झोतांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असतानाही दहीहंडी आणि गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. लेझर झोतांसाठी साहित्य पुरविणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला असून, आतापर्यंंत तीन मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?

लेझर प्रकाशझोतांचा वापर केल्याप्रकरणी प्रभाकर पवार, हर्षद भालसिंग (३५), राकेश चौधरी (३२), गणेश यादव (३०, रा. फुरसुंगी), अजिंक्य ढमाळ (३३, भेकराईनगर), मनोज जगताप (३८, रा. धमाळवाडी), महादेव खापणे (३३, रा. कोल्हापूर), रोशन पाटील (रा. ससाणेनगर), आशिष चव्हाण (रा. हडपसर), अनिकेत जगताप (रा. ससाणेनगर), मोहंमद आशिक (रा. केरळ) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून लेझर झोत (बीम लाइट), ध्वनिवर्धक यंत्रणा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.

हेही वाचा >>> राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान

दहीहंडी, तसेच गणेशोत्सवात लेझर झोतांचा वापर केल्यास कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. दहीहंडीत लेझर झोतांचा वापर मंडळांकडून करण्यात आला होता. शनिवारी (७ सप्टेंबर) प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणा, तसेच लेझर झोतांचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

मंडळांविरुद्ध कारवाईला सुरुवात

गणेशोत्सवात आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंढव्यातील तीन मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवात अनेक मंडळांकडून उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा (साउंड सिस्टीम) वापर केला जातो. आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विसर्जन मिरवणुकीतील कारवाईकडे लक्ष?

विसर्जन मिरवणुकीत लेझर झोतांचा वापर, तसेच उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून नेमकी काय करवाई करण्यात येणार आहे, याकडे सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ, तसेच नागरी विमानतळ आहे. लेझर झोतांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असल्याने पुढील साठ दिवस लेझर झोतांवर बंदीचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.