पुणे : पावसाळ्यामुळे शहरात साथरोगांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. या महिन्यात डेंग्यूचे ६६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले. याचवेळी चिकुनगुण्याचा एक रुग्ण आढळला आहे.

महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे ४७२ संशयित रुग्ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्यूचे निदान झालेले २१ रुग्ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते. एप्रिल ते जून या कालावधीत डेंग्यूचे निदान झालेला एकही रुग्ण सापडलेला नव्हता. जुलैमध्ये मात्र रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या महिन्यात बुधवारपर्यंत (ता.१२) डेंग्यूचे ६६ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत आगामी काळात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा – साताऱ्याच्या एकलव्यचा खडतर सुवर्णप्रवास! ; युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत इतिहास घडवणाऱ्या पार्थच्या यशामागची कहाणी

पावसाळ्यात साथरोगांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर डासोत्पत्ती ठिकाणांचे दैनंदिन सर्वेक्षण केले जात आहे. याचबरोबर औषध फवारणी केली जात आहे. साथरोगांबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीमही राबविली जात आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.