पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी सुमारे ७७ कोटींच्या तूटीचा अर्थसंकल्प शनिवारी मांडण्यात आला. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत उत्पन्नात ४३ कोटींनी वाढ झाली असून, खर्च वाढल्याने जवळपास सात कोटींनी तूटही वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय अधिसभा झाली. या अधिसभेत प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी अर्थसंकल्प सादर केला. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सीएमए चारुशीला गायके या वेळी उपस्थित होते. अर्थसंकल्पात जमा बाजूला ५२४ कोटी १८ लाख १० हजार रुपये, तर खर्च बाजूला ६०० कोटी ९२ लाख ६० हजार रुपये दाखवण्यात आले आहेत. गेल्यावर्षी २०२२-२३च्या अर्थसंकल्पात जमा बाजूला ४८१ कोटी आणि खर्च बाजूला ५५१ कोटी रुपये दाखवण्यात आले होते, तर ७० कोटींची तूट होती.

हेही वाचा >>> पुणे : रोझरी स्कूलचे विनय आरहाना यांना ‘ईडी’कडून अटक, कॉसमॉस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक

 अर्थसंकल्पात संशोधन आणि गुणवत्तेसाठी १० कोटी रुपये, विद्यापीठातील आवारातील इमारतींचे बांधकामासाठी ५३ कोटी ९४ लाख रुपये, इतर सुविधांसाठी १५ कोटी ६० लाख रुपये, खाशाबा जाधव क्रीडा संकुलासाठी ४ कोटी रुपये,  नाशिक आणि नगर येथील उपकेंद्र इमारतींसाठी प्रत्येकी २ कोटी ५० लाख रुपये, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी एक कोटी रुपये, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजनेसाठी एक कोटी रुपये, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी दोन कोटी रुपये, स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजनेसाठी ३ कोटी २५ लाख रुपये, कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका योजनेसाठी ५ कोटी रुपये, विद्यार्थी विकास मंडळासाठी १२ कोटी ४७ लाख रुपये,  सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर योजनांसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १३ कोटी ३१ लाख रुपये नवीन वसतिगृह बांधणे आणि वसतिगृहांची क्षमता वाढवण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितकारी योजनांसाठी ७ कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद आहे. 

हेही वाचा >>> पुणे : विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने, ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी; तरूण अटकेत

विद्यापीठाचे वित्तीय नियोजन आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा संकल्प आणि काही जुन्या योजनांची पुनर्बांधणी करण्यावर भर देण्यात आला आहे. भारतीय संस्कृती, भाषा, स्थानिक ज्ञानकला, भारतीयत्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात उतरवण्याचा विचार प्राधान्याने करण्यात आला आहे. विद्यापीठाची मुलभूत ध्येयधोरणे, आगामी काळातील उद्दिष्ट्ये, सामाजिक गरज आणि अर्थसंकल्पातील आकडेवारी यांची योग्य सांगड घालून प्राप्त परिस्थितीत विद्यापीठाशी निगडित घडकांची अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

– डॉ. संजीव सोनवणे, प्र कुलगुरू

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 77 crore deficit budget of the university pune print news ccp 14 ysh
First published on: 11-03-2023 at 20:50 IST