पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्यासाठी दिलेले दहा कोटी १५ लाख रुपयांचे ७८० धनादेश वटले (बाउन्स) नाहीत. या मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटीस बजाविली आहे. महिन्याभरात कराचा भरणा करावा. अन्यथा दिवाणी दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा नोटिशीतून देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ३३ हजार ६६४ निवासी, औद्याेगिक, मिश्र, माेकळ्या जमीन, औद्योगिक अशा मालमत्ता आहेत. यांपैकी २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाच लाख ४७ हजार ६२९ हजार तर नव्याने नाेंदणी झालेल्या ६० हजार ७२ मालमत्ताधारकांनी ९६६ काेटी रुपयांचा कर भरणा केला. तर, पाच हजारांपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी असलेले एक लाख तीन हजार ६७ मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडे ४५८ काेटी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय, दहा कोटी १५ लाखांचे धनादेश वटले नाहीत. महापालिकेने नागरिकांना कराचा भरणा करता यावा यासाठी १६ विभागीय कार्यालये सुरू केली आहेत. अनेक मालमत्ताधारक ऑनलाइन तर काही जण धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात. परंतु, काहींचे धनादेश खात्यात पैसे नसणे यासह अन्य कारणांनी वटले नाहीत. परिणामी, महापालिकेला धनादेश न वटण्याचा भुर्दंड बसतो. कागदोपत्री कामही वाढते. कर वसुलीला विलंबही झाला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कर भरण्यासाठी नागरिकांनी दिलेले दहा कोटी १५ लाखांचे ७८० धनादेश वटले नाहीत. आता या मालमत्ताधारकांकडून धनादेश स्वीकारला जाणार नसून, त्यांना ऑनलाइन किंवा रोखीच्या स्वरुपातच कराचा भरणा करावा लागणार आहे.

थेरगाव विभागातील सर्वाधिक २३५ धनादेश

थेरगाव विभागातील सर्वाधिक २३५ धनादेश वटले नाहीत. त्याखालोखाल भोसरी ९७, चिंचवड ८५, चिखली ६८, तळवडे २९, सांगवी २८, पिंपरीनगर, दिघी बोपखेल प्रत्येकी २६, निगडी, प्राधिकरण २५, मनपा भवन २३, कस्पटेवस्ती २२, चऱ्होली, मोशी प्रत्येकी १८, किवळे, फुगेवाडी-दापोडी प्रत्येकी १७, वाकड, पिंपरीवाघेरे प्रत्येकी १६ आणि आकुर्डी विभागातील १४ धनादेश आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा कोटी १५ लाख रुपयांचे ७८० धनादेश वटले नाहीत. संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. महिन्याभरात कराचा भरणा न केल्यास खटले दाखल करण्यात येणार आहेत. त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. त्यांच्याकडून आता धनादेश स्वीकारला जाणार नाही. अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग,पिंपरी-चिंचवड महापालिका