पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सिंहगड रस्ता भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ३३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश १५ जुलै रोजी संदेश पाठविला होता. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी ३३ लाख १९ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा न मिळाल्याने ज्येष्ठाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

वाघोली भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने बिबवेवाडी भागातील एका महिलेची सायबर चोरट्यांनी दहा लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ४१ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

कोंढवा भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.

एपीके फाईल पाठवून व्यावसायिकाची फसवणूक

एका व्यावसायिकाच्या मोबाइलवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक तरुण कात्रज भागातील खोपडेनगर भागात राहायला आहेत. चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर दंडात्मक चलन असलेली एपीके फाईल ६ सप्टेंबर रोजी पाठविली होती. तरुणाने संबंधित फाईल उघडली. तेव्हा त्यात ५०० रुपये दंड असल्याचे नमूद करण्यात आले होते. तरुणाने ही फाईल पुन्हा उघडली. तेव्हा चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्याची मााहिती घेतली. गोपनीय माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी तरुणाच्या खात्यातून दोन लाख ५५ हजार रुपये लांबविले. त्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. वरिषठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.