केंद्र आणि राज्य सरकारमार्फत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध योजना, उपक्रम राबविले जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये देखील खर्च केले जात आहे. मात्र मागील काही वर्षांत मुलींचा जन्मदर घटल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. तर हजार मुलांमागे ९५० पेक्षा अधिक मुलींचा जन्मदर आदर्श मानला जातो. मात्र पुण्यासारख्या शहरामध्ये २०२१ ते २०२४ मध्ये हजार मुलांमागे ९०६ ते ९११ मुलींचा जन्म झाला आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली.

याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, मागील दहा वर्षात पुणे शहरात मुलं आणि मुली यांच्या जन्मदाराबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहिती अधिकारात माहिती मागवली होती. ती माहिती मिळाली असून ती धक्कादायक आहे. २०१२ ते २०१४ दरम्यान हजार मुलांच्या जन्मामागे ९३४ ते ९४० असा मुलींचा जन्मदर होता. तर २०२० मध्ये हजार मुलांमागे ९४६ असा मुलींचा जन्मदर राहिला. हा दराच्या जवळपास आहे. ती समाधानाची बाब होती. मात्र त्या नंतर २०२१ ते २०२४ पर्यत हजार मुलांमागे ९११ असा मुलींचा जन्मदर असल्याची माहिती समोर आली आहे. ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. २०२० नंतर नेमक अस काय घडलं की, मुलींचा जन्मदर कमी झाला. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याबाबत सांगायचे झाल्यास गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याचे यातून दिसत आहे. यावर राज्य सरकार आणि पुणे महापालिका प्रशासनाने योग्य ती पावले उचलून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली.