पुणे : राज्यात २५ ऑक्टोबरअखेर ३२ जिल्ह्यांमधील ३०३० गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १४३०७९ बाधित पशुधनापैकी ९३१६६ पशुधन उपचाराने रोगमुक्त झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.

सिंह म्हणाले की, बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४०.९७ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३५.५८ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात असून, जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार सुमारे ९७ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

हेही वाचा :‘लम्पी’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली करणार का?; उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

सुधारित मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करा

महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी उपचार करताना सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे, शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी केले आहे.