औरंगाबाद येथे कुरिअर कंपनीमधून तलवारीचा शस्त्रसाठा जप्त केल्याची घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरातून तब्बल ९७ तलवारी, दोन कुकरी आणि ९ म्यान असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पंजाबमधून औरंगाबाद आणि अमहमदनगर येथे हा शस्त्रसाठा कुरिअरने पाठविला जात होता. परंतु, त्याअगोदरच दिघी पोलिसांनी तो जप्त केला. नेमका हा शस्त्र साठा कशासाठी मागवला जात होता? हे आरोपींच्या चौकशीनंतरच पुढे येणार आहे. या प्रकरणी उमेश सूद (पंजाब), अनिल होण (औरंगाबाद), मनिंदर (पंजाब) , आकाश पाटील (अहमदनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील एका खासगी कुरिअर कंपनीच्या गोदामामधील दोन लाकडी बॉक्समधून तलवारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी खासगी कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाला येणारी कुरिअर एक्सरे मशीन ने स्कॅन करण्यास सांगितली होती. कुरिअर असलेल्या गोदामामध्ये विविध पार्सल स्कॅन केले तेव्हा दोन लाकडी बॉक्समध्ये तलवारी आढळल्या.

पंजाबचा रहिवासी असलेला उमेशने औरंगाबाद येथील अनिल होण याला पार्सल पाठवले होते. अशी माहिती समोर आली आहे. तसेच, दुसऱ्या एका बॉक्समध्ये देखील तलवारी आढळल्या त्या पंजाब येथील रहिवासी असलेल्या मनिंदरने अहमदनगर येथे राहणाऱ्या आकाश पाटील याला कुरिअरद्वारे पाठवल्याचे उघड झाले.

पोलिसांनी एकूण ९७ तलवारी, दोन कुकरी आणि ९ म्यान जप्त केल्या आहेत. एवढा मोठा शस्त्रसाठा कुठे आणि कशासाठी वापरला जाणार होता, याच शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे हे करीत आहेत.