पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ऑक्टोबर महिन्यात ४७ लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. त्यातून विभागाला ९९.५३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

पुणे विभागाने मासिक उद्दिष्टाच्या २५ टक्के अधिक उत्पन्न ऑक्टोबरमध्ये मिळविले आहे. याचबरोबर तिकीट तपासणीतून ऑक्टोबरमध्ये २.६६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १.१ टक्का वाढ नोंदवली गेली. इतर व्यवसायातून रेल्वेला ९.८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. रेल्वेला पार्सलमधून २.५२ कोटी रुपये आणि इतर वाणिज्य कार्यातून १.०७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

आणखी वाचा-केंद्राकडून गहू, तांदूळ खासगी बाजारात; महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई

पुणे विभागात ऑक्टोबरमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २३ हजार १४५ जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १० हजार ७०९ जणांना अनियमित प्रवासासाठी ६२ लाख ६४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या १८५ जणांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मालवाहतुकीतून ४२ कोटींचे उत्पन्न

रेल्वेच्या पुणे विभागाने मालवाहतुकीतून ऑक्टोबरमध्ये ४२.३८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. त्यात वाहने, पेट्रोलियम पदार्थ आणि साखरेची वाहतूक करण्यात आली. मासिक उद्दिष्टापेक्षा २२ टक्के आणि मागील वर्षीच्या तुलनेत ४१ टक्क्यांची वाढ त्यात नोंदवली गेली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.