पुणे : प्रवासासाठी मोटारी भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपनीतील मोटारी चोरुन राजस्थानात पाकिस्तानी सीमेजवळील गावात विक्री करणाऱ्या एकास मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६० लाख रुपयांच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

सुफियान चौहान (वय १९, रा. फतेहगंज, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रवासी मोटारी भाड्याने देणाऱ्या एका कंपनीच्या ॲपवर नोंदणी केल्यानंतर मोटारी भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतात. या कंपनीच्या ॲपवर चौहान आणि साथीदारांनी नोंदणी करुन मोटारी भाडेतत्वावर घेतल्या होत्या. चौहान याने साथीदारांची ओळखपत्रे ॲपवर नोंदणीसाठी दिली होती. चौहानने महागडी मोटार भाडेतत्त्वावर घेतली होती. मोटार घेऊन तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा… सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख असलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचेच समाजमाध्यमातील खाते ‘हॅक’

पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तो मध्यप्रदेशातील इंदूर येथे येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ६० लाख रुपयांच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद कुमरे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, विलास कदम, शेखर शिंदे, सचिन कुटे, सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा… पुण्यातील दहशतवादी प्रकरण ‘एनआयए’कडे; ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटारींची पाकिस्तान सीमेजवळील गावात विक्री

मोटारी भाडेतत्वावर घेऊन पसार झालेला आरोपी सुफियान चौहानने साथीदारांच्या मदतीने राजस्थानातील पााकिस्तानी सीमेजवळ असलेल्या गावात मोटारींची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चौहानने अशा पद्धतीने मुंबईतून मोटारी चोरल्या होत्या. त्याच्याविरुद्ध मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत.