लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ढाबळीतील कबुतर घेतल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एका १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याला कबुतराची विष्टा खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूला हा प्रकार घडला.

या बाबत कात्रजमधील संतोषनगर येथील एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमोल आडम याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूस मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. त्यातील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा… पुण्यातील स्वयंचलित ‘ई-टाॅयलेट्स’ का पडली बंद?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कबुतरे पाळली होती. त्यातील एक कबुतर फिर्यादीच्या १२ वर्षाच्या मुलाने आणले होते. त्यावरुन अमोल आडम हा त्याच्या तीन साथीदारांसह संतोषनगरमध्ये आला. त्यांनी हवेत हत्यारे फिरवून कोणी जर मध्ये आले, तर एका एकाला तोडून टाकीन, असे म्हणून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या बारा वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला दुचाकीवर बसवून कात्रज येथील साई अपार्टमेंट येथे नेले. तेथे त्याला कबुतराची विष्टा खायला लावली. त्यानंतर ‘पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी देऊन त्याला साई मंदिराजवळ सोडून दिले. त्यानंतर त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.