पुणे : उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आल्याने महाराष्ट्रातही तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला थंडी अवतरली आहे. तापमानातील घट आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे निर्माण झालेली पावसाळी स्थिती आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने डिसेंबरमध्ये झाकोळलेली थंडीची कसर जानेवारीत भरून निघणार असल्याचा दीर्घकालीन अंदाजही भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : फक्त शंभर रूपये न दिल्याने टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा हात मनगटापासून कापला

दरवर्षीनुसार यंदाही डिसेंबरमध्ये राज्यात थंडीची कडाका अधिक असेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे थंडीवर परिणाम झाला. चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही राज्याच्या दिशेने बाष्प आले. त्यामुळे डिसेंबरमध्ये बहुतांश वेळेला रात्रीचे किमान तापमान सरासरीपुढे राहून थंडी गायब झाली. सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. काही भागांत दाट धुके निर्माण होत आहे. राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेशातील काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती आहे. राजस्थानमध्ये काही भागांत २ अंशांपर्यंत तापमान खाली आले आहे. या भागातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रातही तापमानात घट होत आहे. पुढील दोन-तीन दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील.

हेही वाचा >>> कडधान्य, तृणधान्यांच्या बियाणांची उपलब्धता कमी; घरगुती बियाणांचा वापर, नगदी पिकांकडे ओढा

संपूर्ण जानेवारीमध्ये मध्य भारताचा बहुतांश भाग, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतात किमान तापमान सरासरीखाली राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडील राज्ये, पूर्वोत्तर भारतात बहुतांश ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीजवळ किंवा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमान सरासरीखाली राहून या भागात थंडी राहणार आहे. दक्षिण कोकणातील किमान तापमान सरासरीजवळ राहील. महाराष्ट्राच्या उर्वरित किनारपट्टीच्या भागात किमान तापमान काही प्रमाणात सरासरीपुढे राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र सर्वांत थंड

डिसेंबरच्या अखेरीस अपेक्षित थंडी पडली नसली, तरी सध्या पुन्हा तापमानात घट सुरू झाली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र सर्वांत थंड आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ मराठवाड्यातील औरंगाबाद येथे १०.७, जळगाव ११.०, तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीजवळ आला आहे. विदर्भातही काही भागांत रात्रीचे तापमान सरासरीजवळ असून, त्यात दोन दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

More Stories onसर्दीCold
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A cold start to the new year with a northerly cold wave the state pune print news pam 03 ysh
First published on: 02-01-2023 at 10:37 IST