पुणे: लष्कर भागात गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैमनस्यातून खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अरबाज बबन शेख (वय ३५, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) असे खून झालेल्या सराइताचे नाव आहे. शेखविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे २५ गुन्हे दाखल आहेत. त्याची लष्कर भागात परिसरात दहशत होती. पोलीस आयुक्तांनी शेख याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. वर्षभरासाठी त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून त्याची नुकतीच सुटका झाली होती. लष्कर भागातील ताबूत स्ट्रीट परिसरात खाऊ गल्ली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास तेथे मारामारी सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली.

हेही वाचा… पुणे पोलीस शाब्बास ! देशातील बॉम्बस्फोटाचा दहशतवाद्यांचा कट उधळला; राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दहा लाखांचे रोख बक्षीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते, तसेच त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रियांका शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ताबूत स्ट्रीट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.