पुणे : महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पुणे तसेच खडकी कँन्टोन्मेंटमधील नागरी परिसराचा समावेश महापालिकेत करण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे कॅन्टोन्मेंटमधील नागरी भागाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याबाबत (आज) गुरुवारी बैठक होत आहे. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने राज्य सरकारने पुन्हा कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. यासंदर्भातच गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे कॅन्टोन्मेंट विलीनीकरण करण्याबाबत राज्य सरकार ठोस भूमिका घेणार का? महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनीकरण होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निर्णय झाल्यास प्रभाग रचना बदलावी लागणार
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलीनीकरणाचा ठोस निर्णय गुरुवारी होणाऱ्या बैठकीत घेऊ शकते. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नियोजन केले जात असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे आता विलीनीकरणाची घोषणा झाल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर होणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेतही बदल होण्याची शक्यता आहे. भवानी पेठ आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत यामुळे वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.