पुणे : अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
इरफान गुड्डूभाई मुजावर (वय २४), आयुब गुड्डूभाई मुजावर (वय २२, दोघे रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीला आरोपी मुजावर गेल्या १५ दिवसांपासून धमकावत हाेते. मुजावर यांनी मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीला धमकावून त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघांकडून मुलीवर अत्याचार करण्याचे प्रकार सुरू होता. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली.
दोघांना अटक करण्यात आली असून सामूहिक बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.