पुणे : बाणेर परिसरात एका सराफी व्यावसायिकाने मित्रावर गोळ्या झाडून नंतर स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकारात सराफी व्यावसायिकाचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून हल्लेखोराने स्वतः:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातही त्यास्वरूपाची घटना घडल्याने खळबळ  उडाली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

अनिल अप्पा ढमाले ( वय ५२, रा. बालेवाडी ) असे मृत्युमुखी पडलेल्या सराफी व्यावसायिकाचे नाव आहे.त्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये त्यांचा मित्र आकाश जाधव ( वय ५०, रा. बाणेर ) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून बेरोजगारांची थट्टा, घेतला ‘हा’ निर्णय

ढमाले यांचे बाणेरमध्ये ‘अनिल ज्वेलर्स’ ही सराफी पेढी आहे. हे दुकान त्यांनी आकाश जाधव यांच्या मालकीच्या जागेत थाटले होते. त्यापोटी ते त्यांना दरमहा भाडे देत होते. मात्र, आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद झाला होता. ढमाले आणि जाधव सायंकाळी सातच्या सुमारास दुचकीवरून बाणेर परिसरातील दुर्गा कॅफेच्या परिसरातून निघाले  होते. जाधव गाडी चालवत होते, तर ढमाले मागे बसले होते. अचानक ढमाले यांनी मागून जाधव याच्या डोक्यात पिस्तुलाची गोळी झाडली. त्यामुळे गाडी आणि दोघेही रस्त्यावर कोसळले. त्यानंतर ढमाले यांनी तातडीने रिक्षा थांबवली. ते औंधकडे निघाले होते. काही अंतरावर त्यांनी  स्वतः:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली.या घटनेने रिक्षाचालकाने घाबरून रिक्षा जागीच थांबवली. रिक्षाचालकाने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने तेथून निघालेले नागरिक मदतीला धावले. या घटनेची माहिती समजताच गस्तीवरील पोलीस तसेच चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी पथकासमवेत घटनास्थळी धाव  घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाणेरमध्ये जाधव हे जखमी अवस्थेत पडले होते.  पोलिसांनी त्वरित दोन पथके करून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणीपूर्वीच ढमाले यांचा मृत्यू झाला होता. जाधव याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर  वरिष्ठ पोलीस  अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ढमाले व जाधव यांचा औंध, बाणेर परिसरात जनसंपर्क होता. त्यामुळे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयाजवळ जमले होते.