पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात कोयता गँगने माजविलेली दहशत, तसेच पाेलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे गस्तीवरील पोलिसांना पिस्तूल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्वरित घटनास्थळी पोहोचून कारवाई करणाऱ्या पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांना अत्याधुनिक दुचाकी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतला आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागात पोलीस ठाण्यातील कर्मचारी (बीटमार्शल) दिवसा आणि रात्री गस्त घालतात. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचणाऱ्या पोलिसांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना पिस्तूल आणि अत्याधुनिक दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यात विश्रांतवाडी भागात चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणारे उपाहारगृह बंद करण्यास सांगितल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता.
हेही वाचा – पुणे : तळजाईच्या जंगलात बांधकाम व्यावसायिक तरुणाची आत्महत्या
शहरात भरदिवसा गजबजलेल्या भागात कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना घडल्या आहेत. गस्त घालणाऱ्या पोलिसांकडे काठी असल्याने सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर हल्ले होतात. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांना पिस्तूल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालणाऱ्या २५० पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षित पोलिसांची तुकडी
शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना पिस्तूल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गस्तीसाठी अत्याधुनिक १२५ दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एका दुचाकीवर दोन पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. त्यासाठी २५० पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच प्रशिक्षित पोलिसांच्या तुकडीकडून शहरात गस्त घालण्यात येणार आहे.
रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढली तर गुन्हेगार, चोरट्यांना धाक बसतो. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अद्ययावत दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच गस्तीवरील पोलिसांना पिस्तूल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.